अजित पवारांच्या बैठकीला चार आमदारांची दांडी

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभव आणि 19 आमदार सोडून जाण्याची भीती या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आज बैठक बोलावली होती, पण या बैठकीला चार आमदारांनी दांडी मारल्याने चर्चेला उधाण आले होते.

लोकसभा निवडणुकांत अजित पवार गटाला अपयश आले आहे. चारपैकी केवळ एका जागेवर त्यांचा उमेदवार निवडून आला. त्यामुळे अस्वस्थ झालेले अजित पवार गटाचे 19 आमदार शरद पवार यांच्या संपका&त असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिल्यामुळे अजित पवार गटात प्रचंड अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी दिवसभर बैठका घेतल्या. सकाळी त्यांच्या ‘देवगिरी’ या निवासस्थानी पक्षाच्या कोअर ग्रुपची बैठक झाली. अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे आदी बैठकीला उपस्थित होते. संध्याकाळी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदारांची बैठक पार पडली, पण या बैठकीला धर्मरावबाबा अत्राम, सुनील टिंगरे, नरहरी झिरवाळ, राजेंद्र शिंगणे उपस्थित राहिले नाहीत. पण त्यावर नरहरी झिरवाळ हे परदेशात आहेत, धर्मरावबाबा अत्राम व राजेंद्र शिंगणे आजारी आहेत, सुनील टिंगरे बाहेरगावी आहेत, अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली.

मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी
पक्षातील आमदारांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता दूर करण्यासाठी आता अजित पवार गटाकडून मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी पुढे रेटण्यात येत आहे. त्यामुळे आमदारांमधील अस्वस्थता दूर होऊ शकते, असे आमदारांचे मत आहे. मात्र याबाबत पत्रकारांनी सुनील तटकरे यांना विचारले असता, आजच्या कोअर ग्रुपच्या बैठकीत तरी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झालेली नाही. मात्र याबाबतचा निर्णय हा मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दिल्ली स्तरावरच होईल, असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.