
कपडे धुण्यासाठी गेलेले चौघेजण पुंडलिका नदीत बुडाल्याची हृदयद्रावक घटना माणगाव तालुक्यातील साजे परिसरात आज घडली. दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात बचाव पथक आणि पोलिसांना यश आले आहे. अन्य दोघांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. पुंडलिका नदीत बुडालेले चौघेही एकाच कुटुंबातील असून ते नवी मुंबईत राहत होते.
नवी मुंबईत वास्तव्य करणारे सिद्धेश सोनार (21), काजल सोनार (26), सिद्धी पेडेकर (16) आणि सोनी सोनार (27) हे आपल्या आजीच्या गावी शिरवली येथे आले होते. हे सर्व जण आज कपडे धुण्यासाठी पुंडलिका नदीवर गेले. त्यांच्यापैकी सिद्धेश पाण्यात पडला. पोहता येत नसल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी अन्य तिघांनी पाण्यात उडय़ा मारल्या. त्यांनाही पोहता येत नसल्याने सर्वच जण बुडाले. या घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस व रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. बचाव पथकाने सिद्धेश आणि सिद्धी या दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहे. अन्य दोघांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. या दुर्घटनेमुळे शिरवली गावावर शोककळा पसरली आहे.