
पुण्यातील डेक्कन नदीपात्र परिसरात विजेचा शॉक लागून तिघा कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. येथील अंडा भुर्जीची गाडी दुसऱ्या जागी हलवत असताना त्यांना शॉक लागला. त्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अभिषेक अजय घाणेकर (वय 25), आकाश विनायक माने (वय 21) ,शिवा जिदबहादुर परिहार (वय 18, रा . डेक्कन) अशी मृत तरुणांची नावे आहेत. दरम्यान, मावळ तालुक्यातील आदरवाडी गावात दरड कोसळून एकाचा मृत्यू, तर एक जण जखमी झाला आहे. मयत तरुण एका रेस्टॉरंटचा कर्मचारी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही तरुण नदीपात्र परिसरातील झेड पुलाखालील अंडा भुर्जीच्या गाडीवर काम करत होते. पुण्यात कालपासूनच जोरदार पाऊस आहे. त्यातच गुरुवारी पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे सर्वत्र पाणी तुंबले आहे.
पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास झेड पुलाखालील नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढला होता. त्यामुळे अंडा भुर्जी गाडीवर काम करणारे तीन तरुण अंडा भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलविण्याकरता गेले होते. तेव्हा त्यांना विजेचा शॉक लागला. त्यांना तात्काळ जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले आहे.
View this post on Instagram
घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डेक्कन पोलीस पुढील तपास करत आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुण्यात ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. पुण्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच सर्व कार्यालयेही बंद ठेवण्यात आली आहेत, पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितले.