4 विद्यार्थिनींना ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर करणं पडलं महागात, वसतीगृहाने केली कारवाई

महाराष्ट्रातील एका वसतीगृहातून  अनोखे प्रकरण समोर आले आहे. या वसतीगृहामधील 4 विद्यार्थिनींना ऑनलाईन पिझ्झा मागवणे चांगलेच महागात पडले आहे. वसतीगृहाने चारही विद्यार्थिनींवर कारवाई करत त्यांना काढून टाकले आहे.

महाराष्ट्रातील पुणे येथील मोशी येथे असलेले समाज कल्याण वसतिगृह सामाजिक न्याय विभागाद्वारे चालवले जाते. वृत्तानुसार, वसतीगृहाची वॉर्डन मिनाक्षी नरहरी यांना सूचना मिळाली की, विद्यार्थिनीच्या खोलीत ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर करण्यात आला होता. ज्यावेळी त्यांनी याबाबत अन्य विद्यार्थिनींना विचारपूस केली त्यावेळी सर्वांनी त्याबाबत नकार दिला. त्यानंतरही वॉर्डनने विद्यार्थिनींवर कारवाई करत चारही विद्यार्थिनींना एक महिन्यासाठी वसतीगृहामधून निलंबित केले आहे.

एवढेच नाही तर त्यानंतर वसतिगृह प्रशासनाने विद्यार्थिनींच्या पालकांनाही बोलावून त्यांच्या मुलींनी केलेल्या चुका निदर्शनास आणून दिल्या. विद्यार्थिनींच्यावतीने पालकांनीही माफी मागितली, मात्र अधिकाऱ्यांनी कोणताही दिलासा दिला नाही आणि विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याचे आदेश दिले. वसतिगृह प्रशासनाने कारवाई करण्यापूर्वी अधिकृत सूचनाही जारी केली होती. नोटीसमध्ये स्पष्टपणे लिहिले होते की, जर 8 फेब्रुवारी 2025 पर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याने वसतिगृहात पिझ्झा कोणी ऑर्डर केला होता हे सांगितले नाही तर चारही विद्यार्थिनींना एका महिन्यासाठी निलंबित करण्यात येईल. विद्यार्थिनींनी शैक्षणिक कारकिर्दीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.