
काळ कधी, कुणाला, कुठे गाठेल हे सांगता येत नाही. मध्य प्रदेशमधील जबलपूर जिल्ह्यात एका धार्मिक कार्यक्रमात बळी देण्यासाठी बोकड घेऊन निघालेली एक एसयूव्ही कार कोरड्या नदीमध्ये कोसळली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या भीषण अपघातातून बोकड मात्र वाचले आहे.
स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पटेल कुटुंबातील सहा जण नरसिंहपूरच्या दादा दरबार येथे बोकड आणि कोंबड्याचा बळी देण्यासाठी निघाले होते. बोकड आणि कोंबडा प्रतिकात्मक भोग दाखवून घरी येऊन पटेल कुटुंब चिकन-मटणवर ताव मारणार होते. मात्र जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 30 किलोमीटर दूर चरगवा-जबलपूर मार्गावर सायंकाळी तीन ते चारच्या सुमारास एसयूव्ही कार पुलाचे कठडे तोडून कोरड्या नदीमध्ये कोसळली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने मदत आणि बचावकार्य सुरू केले. जखमींना कार बाहेर काढण्यात आले आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उंचावरून पडल्यामुळे कारचा चेंदामेंदा झाला होता आणि मृतदेह अडकून बसले होते. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले व मृतांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली.
किशन पटेल (वय – 35), महेंद्र पटेल (वय – 35), सागर पटेल (वय – 17) आणि राजेंद्र पटेल (वय – 16) या चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर जितेंद्र पटेल (वय – 36) आणि मनोज प्रताप (वय – 35) हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पटेल कुटुंब बळीसाठी एक बोकड आणि कोंबडाही सोबत घेऊन जात होते. या अपघातामध्ये कोंबड्याचा मृत्यू झाला, तर बोकडाचा कान कापला गेला, मात्र त्याचा जीव वाचला, असे पोलिसांनी सांगितले. पोलीस सध्या शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत असून दोघे जखमीही जबाब नोंदवण्याच्या स्थितीत नाही. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.