
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला वेठीस धरले होते. या धक्क्यातून जग सावरतेय तोच नवनवीन व्हायरस पुन्हा हल्ला करत असल्याचे उघड झाले आहे. गुजरातमध्ये ‘चांदिपुरा’ नावाचा व्हायरस आला असून या व्हायरसमुळे दोनच दिवसांत चार मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. साबरकांठा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या मुलांचा मृत्यू झाला. दरम्यान, सध्या या मुलांच्या रक्ताचे आणि थुंकीचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत. या व्हायरसमुळे देशभरात खळबळ उडाली आहे.
या व्हायरसची लागण झालेल्या आणखी दोन मुलांवर उपचार सुरू असल्याचे समजते. मुलांच्या मृत्यूनंतर आरोग्य विभागही सावध आणि सक्रिय झाला असून साबरकांठा आणि अरवली जिह्यात नवीन व्हायरसबाबत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. पाठवलेल्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर सोमवारी अहवाल देण्यात येईल. या व्हायरसचा शिरकाव वेळीच रोखण्यासाठी आरोग्य विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱयांची लवकरच बैठक होऊ शकते, असा दावा केला जात आहे. या बैठकीत विविध चाचण्यांसह इतर योजनांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.