बांगलादेशातील तपास यंत्रणांनी हिंदू मंदिरे आणि घरांवर हल्ले केल्याप्रकरणी चार जणांना अटक केल्याचे वृत्त आहे. सुनमगंज जिह्यातील हिंदूंचे मंदिर आणि दुकानांची तोडफोड केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली. तर एकूण 170 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
3 डिसेंबर रोजी एका फेसबुक पोस्टमुळे सुनमगंज जिह्यात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर वाद उफाळून आल्याने पोस्ट हटवण्यात आली, परंतु या पोस्टचे स्क्रीन शॉट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे या परिसरात हिंसाचार पसरला. हिंसाचारादरम्यान दंगलखोरांनी सुनमगंजमधील लोकनाथ मंदिर आणि हिंदूंच्या घरांची तोडफोड केली. हिंसाचारानंतर पोलिसांनी त्याच दिवशी फेसबुक पोस्टप्रकरणी आकाश दास याला ताब्यात घेतले. त्याला सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हा मुख्यालयाच्या पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.