सोने व्यापाऱ्याला लुटणाऱ्या चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या, 4 लाखांचा मुद्देमाल जप्त

जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव रोडवर सोने व्यापाऱ्याला लुटणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून रोख व सोन्याचे दागिने असा 4 लाखांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला.

जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव रोडवर 15 जानेवारी रोजी सचिन सुरेश खर्डेकर (रा. गोपालपुरा, जालना) यांना मोटारसायकलवरून खाली पाडले. त्यांच्या ताब्यातील 4 लाख 75 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व 55 हजार रोख असा मुद्देमाल असलेली बॅग हिसकावून लंपास केली. सच्चिन यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपास करत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, जबरी चोरी गणेश शेजूळ (रा. वाल्मीकनगर, जालना) याने त्यांच्या साथीदारांच्या मदतीने केली आहे. 18 जानेवारी रोजी गणेश महादेव शेजूळ (रा. वाल्मीकनगर, जालना) यास ताब्यात घेतले. गुन्हयाच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने कबुली दिली. हा गुन्हा त्याने व त्याचे साथीदार विशाल अजयसिंग राजपूत (रा. लोधी मोहल्ला, जालना), जयेश किशोर राजपूत (रा. गांधीनगर, जालना), अभिजित राजेश पवार (रा. रामनगर, जालना) यांच्या मदतीने केला. असल्याची कबुली दिली. लुटलेला मुद्देमाल ३ लाख ७२ हजार १५ रुपयांचे सोन्याचे दागिने व 15 हजार रोख व 15 हजारांचा मोबाईल असा ४ लाखांचा मुद्देमाल काढून दिला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व अपर पोलीस अर्धाक्षर आयूष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे, सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बाघ, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, रामप्रसाद पव्हरे, प्रभाकर वाघ, रमेश राठोड, भाऊराव गायके, गोपाल गोशिक, सुधीर वाघमारे, सागर बाविस्कर, गणपत पवार, इंरशाद पटेल, सतीश श्रीवास, देविदास भोजने, रमेश काळे, संदीप चिंचोले, कैलास चेके सर्व स्था.गु.शा. जालना यांनी केली आहे.