किल्ले दुर्गाडीच्या गेटला तडे गेले असून तो जीर्ण अवस्थेत आहे, मंदिराचा चौथरा घुशींनी पोखरलेला आहे, चौथऱ्यावरील लाह्या तुटलेल्या आहेत. तसेच चौथऱ्याला तटबंदी नसल्यामुळे तो ढासळण्याच्या स्थितीत आहे. 50 वर्षे कोर्टात सुरू असलेल्या खटल्यामुळे किल्ल्याचे कोणतेही काम होऊ शकले नाही. परंतु आता न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य शासनाच्या ताब्यात किल्ला आला आहे. त्यामुळे शासनाने, पालिकेने किल्ल्याची दुरुस्ती आणि सुशोभीकरण करावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने केडीएमसी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
किल्ले दुर्गाडी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पशनि पावन झालेले पवित्र स्थान असून या स्थळामुळेच कल्याण शहराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. किल्ल्यावरील दुर्गाडी मंदिर कल्याणकरांचे ग्रामदैवत आहे. या पवित्र स्थळामुळे किल्ले दुर्गाडीने प्रत्येक कल्याणकरांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. नुकत्याच झालेल्या न्यायालयीन निर्णयानुसार, किल्ले दुर्गाडीचा संपूर्ण ताबा सरकारकडे आला आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर किल्ले दुर्गाडी व त्याभोवतालच्या परिसराचे संपूर्ण सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते विजय साळवी यांनी कल्याण- डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्याकडे केली आहे.
दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाचे काम सुरू असून नंतर मंदिराच्या चौथऱ्याचे काम होणार असल्याचे समजते. परंतु अशा प्रकारे तुकड्यांमध्ये डागडुजीचे काम करण्याऐवजी किल्ल्याचा संपूर्ण आराखडा तयार करून एका रचनाकाराकडून सुंदर कलाकृती स्वरूपात काम पूर्ण करावे.
• विजय साळवी, उपनेते.