स्नेहलता देशमुख यांचे निधन

मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू, ख्यातनाम शल्यविशारद, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. स्नेहलता देशमुख यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. कुलगुरू पदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक धडाडीचे निर्णय घेतले. विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रावर वडिलांप्रमाणेच आईचेही नाव छापण्याचा निर्णय त्यांनीच घेतला होता.  सध्या त्या मुंबईतील पार्ले टिळक विद्यालय संस्थेच्या संचालक मंडळात विश्वस्थ म्हणून कार्यरत होत्या.

सोमवारी सायंकाळी विलेपार्ले येथील स्मशानभूमीत डॉ. स्नेहलता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या, शिक्षण पद्धतीतले नवे बदल स्वीकारणाऱ्या कुलगुरू म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. तसेच त्यांना अनेक मानसन्मानही मिळाले होते. कुलगुरू या पदावर असताना अनेक धडाडीचे आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेत सक्षम युवा पिढीच्या निर्मितीसाठी त्यांनी पुढाकार घेतला. प्रख्यात बालरोग शल्यचिकित्सक म्हणून त्यांनी केलेले कार्य आणि ‘दुग्धपेढी’ ही त्यांची संकल्पना वैद्यकीय क्षेत्रात नेहमीच स्मरणात राहणारी ठरली.

डॉ. स्नेहलता देशमुख यांनी गर्भसंस्कार, नवजात शिशू आणि माता यांचा आहार या विषयांमध्ये महत्त्वाचे कार्य केले. त्या शिव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या अधिष्ठाताही होत्या. 1995 त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी गर्भसंस्कार तंत्र आणि मंत्र, तंत्रयुगातील उमलती मने, अरे संस्कार संस्कार ही पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना डॉ. बी.सी. रॉय पुरस्कार, धन्वंतरी पुरस्कार या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

डॉ. स्नेहलता देशमुख यांचा अल्प परिचय

डॉ. स्नेहलता देशमुख या लहानपणापासून प्रचंड मेहनती आणि जिद्द बाळगणाऱ्या होत्या. रांगोळी, एम्ब्रॉयडरी, ड्रॉइंग-पेंटिंग, गाणी या सर्व कलांमध्ये त्या पारंगत होत्या. स्नेहलताबाईंचे वडील म्हणजे डॉ. श्रीकृष्ण वासुदेव जोगळेकर हे शस्त्रक्रियेची (सर्जरीची) पदवी प्राप्त केलेले उत्तम डॉक्टर होते. मुंबईतील शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालय व के.ई.एम. रुग्णालय येथे अधिष्ठाता म्हणून यशस्वी कारकीर्द घडवणारे डॉक्टर म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत स्नेहलता देशमुखही डॉक्टर झाल्या. यशाची अनेक शिखरे त्यांनी गाठली.

 शैक्षणिक कारकीर्द

डॉ. स्नेहलता यांचे शालेय शिक्षण इंटरपर्यंत झाले होते, तर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी दादर येथील इंडियन एज्युकेशन सोसायटीची मुलींची शाळा आणि रुईया महाविद्यालयातून घेतले.

त्यानंतर त्यांनी जी.एस. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. एम.बी.बी.एस.ला त्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये सर्वप्रथम आल्या व पुढच्या शस्त्रक्रियेच्या शिक्षणासाठी हक्काने टाटा रुग्णालयामध्ये गेल्या. पण त्यांना प्रवेश नाकारण्यात आला; कारण त्या वेळी कर्करोगावरच्या शस्त्रक्रियेसाठी मुलींना प्रवेश देण्यात येत नसे. स्नेहलता देशमुख यांनी प्रवेश मिळावा म्हणून बराच संघर्ष केला; पण त्यांना यश आले नाही.

अखेरीस त्यांनी जी.एस.मध्ये अर्भकांवरची शस्त्रक्रिया या विषयात पुढील शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यावर एक विख्यात शल्यविशारद म्हणून त्यांनी ख्याती मिळवली.

मुंबई विद्यापीठाकडून श्रद्धांजली अर्पण

मुंबई विद्यापीठाच्या वतीने माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रख्यात बालशल्यचिकित्सक व लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. स्नेहलता देशमुख यांनी 5 मे 1995 रोजी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची सूत्रे हाती घेतली. सूत्रे हाती घेतल्याबरोबरच त्यांनी आपल्याबरोबर आपल्या धन्वंतरी कुशलतेने आणि मायेने विद्यापीठाच्या वातावरणात विद्वता आणि शिस्त यांचा सुरेख संगम प्रत्ययास आणून दिला. संस्कृत, मराठी आणि इंग्रजी भाषेवरील त्यांच्या प्रभुत्वावरून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि व्यासंगाचा प्रत्यय सर्वांना दिसून आला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या वैभवशाली व विद्याशास्त्रीय परंपरेत व विद्यापीठाच्या उत्कर्षामध्ये त्यांचे अतुलनीय योगदान लाभले आहे. मुंबई विद्यापीठाच्या गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्रावर आईचे नाव लिहिण्याचा ऐतिहासिक आणि दूरगामी निर्णय त्यांनी घेतला. काळाची गरज ओळखून आजचे अनेक सर्वाधिक पसंतीचे व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम त्यांनी सुरू केले.