Hush money trial – सर्व 34 प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प दोषी सिद्ध, 11 जुलैला शिक्षा सुनावली जाणार

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि सध्या राष्ट्राध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. ‘हश मनी’ प्रकरणामध्ये डोनाल्ड ट्रम्प दोषी सिद्ध झाले आहेत. पॉर्न स्टार्ससोबतच्या व्यवहाराच्या एकूण 34 प्रकरणात अमेरिकन कोर्टाने डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवले असून 11 जुलै रोजी त्यांना शिक्षा सुनावणी जाणार आहे.

पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनयलस हिला पूर्वीच्या संबंधांबाबत भाष्य करू नये यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी पैसे दिले होते. 2016च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यानचे हे प्रकरण आहे. गुरुवारी या प्रकरणाची तब्बल साडे नऊ तास सलग अंतिम सुनावणी पार पडली. 12 सदस्यी ज्यूरीने दोन्ही बाजू जाणून घेत ट्रम्प यांना दोषी ठरवले. आता त्यांना कोणती शिक्षा सुनावली जाणार हे 11 जुलै रोजी स्पष्ट होईल.

काय आहे प्रकरण?

पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनिलयस हिने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत आपले पूर्वी संबंध असल्याचा दावा केला होता. त्या संबंधांचे किस्से आणि आठवणी तिने अमेरिकेतील काही प्रकाशकांकडे प्रसिद्धीसाठी पाठवले होते. मात्र त्यांना प्रसिद्धी मिळू नये यासाठी ट्रम्प यांनी स्टॉर्मीला 1 लाख 30 हजार डॉलर्स दिले. 2018मध्ये वॉल स्ट्रीट जर्नलने हा व्यवहार उघड केला. यानंतर ट्रम्प यांच्यावर फौजदारी खटला चालविण्यात आला. कोर्टाने 6 आठवड्यात जवळपास 22 साक्षिदारांची सुनावणी घेतली आणि गुरुवारी ट्रम्प यांनी दोषी ठरवले. यावेळी ट्रम्प हे कोर्टात उपस्थित होते.

ट्रम्प यांचा थयथयाट

दरम्यान, माध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी खटल्याच्या ट्रायलदरम्यान फसवणूक झाल्याचा आरोप केला असून न्यायाधीश भ्रष्टाचारी असल्याचे म्हटले. तसेच 5 नोव्हेंबर रोजी जनताच खरा निर्णय देईल, असेही ते म्हणाले.