माजी कसोटीपटू आबिद अली यांचे निधन

मध्यमगती गोलंदाजीसह कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यात माहीर असलेले हिंदुस्थानचे माजी अष्टपैलू कसोटीपटू सय्यद आबिद अली यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर हिंदुस्थानी क्रिकेटमधून शोक व्यक्त होत आहे.

आबिद अली हे 60-70च्या दशकातील हिंदुस्थानी कसोटीपटू होते. फक्त प्रथम श्रेणी क्रिकेटच्या काळ असलेल्या त्या जमान्यात आबिद अली यांची शैली ही एकदिवसीय क्रिकेटला साजेशी होती. 9 सप्टेंबर 1941 साली जन्मलेल्या आबिद अली यांनी 1967 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेडमध्ये हिंदुस्थानकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. कारकीर्दीत 29 कसोटी खेळताना त्यांनी 47 विकेट टिपले. तसेच 1974 साली त्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्येही पदार्पण केले होते. पाच एकदिवसीय सामन्यांत त्यांच्या नावावर 7 विकेटची नोंद आहे. कसोटी क्रिकेटमध्ये आबिद अली यांनी 6 अर्धशतकांसह 1018 धावा फटकाविल्या होत्या. आबिद अली यांनी कारकीर्दीत 212 प्रथम श्रेणी सामने खेळताना 397 बळी टिपले, तर 8732 धावाही फटकाविल्या आहेत. 12 लिस्ट ए क्रिकेटचे सामने खेळताना त्यांनी 19 बळींसह 169 धावाही केल्या.

संघाच्या गरजेनुसार सर्व काही करायचे ः गावसकर

आबिद अली यांच्या निधनाबद्दल सुनील गावसकर यांनी शोक व्यक्त करत त्यांच्या आठवणी जागविल्या. संघाच्या गरजेनुसार ते सर्वकाही करायला नेहमी तयार असायचे. तळाचे फलंदाज असूनही ते मधल्या फळीत अन् गरज पडल्यास सलामीलाही खेळायला यायचे. नवीन चेंडूवर त्यांनी पहिल्याच चेंडूवर दोनदा बळी टिपल्याचे मला स्पष्टपणे आठवते. माझ्या पदार्पणाच्या सामन्यात त्यांना फलंदाजीत बढती मिळाली होती. एक जंटलमन क्रिकेटपटू आपण आज गमावला, अशा शब्दांत सुनील गावसकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.