कल्याणमध्ये मिंधे गटाच्या माजी नगरसेवकाची महिलेने केली भर रस्त्यात धुलाई; व्हिडीओ व्हायरल

लाडक्या बहिणींना जनतेचे पैसे वाटून स्वतःची टिमकी वाजवणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षातच त्यांच्या महिला कार्यकर्त्या सुरक्षित नाहीत, हे कल्याणमधील एका घटनेने अधोरेखीत झाले आहे. एका महिलेने भर रस्त्यात अश्लील वर्तन केल्याप्रकरणी मिंधे गटाच्या माजी नगरसेवकाची चांगलीच धुलाई केली आहे. ती महिला मिंधे गटाचीच महिला कार्यकर्त्या असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे मिंधे गटातच महिला सुरक्षित नसल्याची चर्चा होत आहे. ही घटना कल्याण अहिल्याबाई चौक परिसरात घडली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मोहन उगले असे मिंधे गटाच्या या माजी नगरसेवकाचे नाव आहे. तर त्याची धुलाई करणाऱ्या महिलेचे नाव राणी कपोते असे आहे.

कल्याणच्या अहिल्याबाई चौकात मारहाणीची घटना घडली आहे. काँक्रीट रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी रविवारी या दोघांचाही श्रेयावरून वाद झाला होता. सोमवारी दुपारच्या सुमारास माजी नगरसेवक मोहन उगले आणि राणी कपोते हे दोघे कल्याणमधील अहिल्याबाई चौक परिसरात समोरासमोर आले. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली त्यानंतर राणी कपोते यांनी उगले यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करीत त्यांना बेदम मारहाण करायला सुरुवात केली. जवळपास अर्धा ते पाऊण तास हा प्रकार सुरू होता. एकाच गटाच्या कार्यकर्त्यांचा झालेला हा राडा पाहण्यासाठी रस्त्यावर एकच गर्दी पाहायला मिळाली. आता मिंधे गटातच महिला सुरक्षित नसल्याची चर्चा होत आहे.