माजी RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पंतप्रधान मोदींच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती; निवृत्तीनंतर मिळाली मोठी जबाबदारी

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव-2 म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळाइतका असेल. डिसेंबर 2018 मध्ये त्यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाली आणि त्यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर 2024 रोजी संपला आहे. आता ते पंतप्रधानांचे प्रधान सचिव-1 डॉ. पी.के. मिश्रा यांच्यासोबत पंतप्रधानांचे प्रधान सचिव 2 म्हणून काम पाहणार आहेत.

केंद्र सरकारच्या नियुक्ती समितीने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. त्यात म्हटले आहे की, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने शक्तीकांत दास, आयएएस (निवृत्त) यांची पंतप्रधानांचे प्रधान सचिव-2 म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. ही नियुक्ती त्यांनी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून प्रभावी असेल. त्यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या कार्यकाळात किंवा पुढील आदेश येईपर्यंत कायम असेल.

ओदिशाची राजधानी भुवनेश्वर येथील रहिवासी असलेले 67 वर्षीय शक्तीकांत दास हे 1980 च्या बॅचचे तामिळनाडू कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी केंद्र आणि तामिळनाडू सरकारमध्ये विविध पदांवर काम केले आहे. केंद्रात त्यांनी विविध टप्प्यांवर आर्थिक व्यवहार सचिव, वित्त सचिव आणि खत सचिव म्हणून काम पाहिले आहे. आता RBI मधील निवृत्तीनंतर त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.