भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी अध्यक्ष राजन शिरोडकर यांचे निधन

भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी अध्यक्ष राजन शिरोडकर यांचे आज हिंदुजा रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी मेनका, मुलगा शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर आणि सून असा परिवार आहे. रात्री उशिरा शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

राजन शिरोडकर यांनी भारतीय विद्यार्थी सेनेत झोकून देऊन काम केले. भारतीय विद्यार्थी सेना ग्रामीण भागात रुजवण्यात आणि विविध विद्यापीठांवर भारतीय विद्यार्थी सेनेचा झेंडा रोवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. 1983 मध्ये ते भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष झाले. ते मुंबई विद्यापीठाचे दोन वेळा सिनेट सदस्य होते.

राजन शिरोडकर हे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासू शिलेदारांपैकी एक होते. पुणे जिह्यात शिवसेना मजूबत करण्यासाठी शिवसेनाप्रमुखांनी राजन शिरोडकर यांची 1993मध्ये पुणे जिल्हा संपर्कप्रमुख या पदावर नियुक्ती केली. त्यानंतर 1995मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातून शिवसेनेचे पाच आमदार निवडून आले होते.

आदित्य ठाकरे यांनी प्रचारसभा पुढे ढकलली

माहीम विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची दादर येथील पुंभारवाडा येथे आज प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती; मात्र राजन शिरोडकर यांच्या निधनामुळे ही प्रचारसभा पुढे ढकलण्यात आली आहे.