
मालेगाव बॉम्बस्फोटाशी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे कनेक्शन उघड झाले आहे. तत्कालीन एटीएसचे अधिकारी मेहबुब मुजावर यांना परमबीर यांनी नागपूर येथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना मुंबईला घेऊन येण्याचे आदेश दिले होते, मात्र या आदेशाचे पालन परमबीर यांनी न केल्याने मुजावर यांचा बळी देत त्यांना या प्रकरणात गोवण्यात आले असा दावा वकिलांनी आज सत्र न्यायालयात केला.
मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी मशिदीजवळ मोटारसायकलवर बॉम्बस्फोट होऊन 6 ठार, तर 100 हून अधिक नागरिक जखमी झाले होते. या खटल्याची विशेष एनआयए न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू आहे. आज गुरुवारी न्यायाधीश ए के लाहोटी यांच्या समोर झालेल्या सुनावणीवेळी या खटल्यातील संशयित सुधाकर द्विवेदी यांच्या वतीने अॅड रणजित सांगळे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, तत्कालीन एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांना परमबीर सिंग यांनी बोलावले आणि नागपूरला जाऊन आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांना मुंबईला घेऊन येण्याचे आदेश दिले. हे आदेश बेकायदेशीर व तोंडी असल्याने त्यांनी त्याचे पालन केले नाही. परिणामी मुजावर यांना सोलापुरातील एका खोटय़ा प्रकरणात गोवण्यात आले. माजी एटीएस अधिकारी मुजावर यांनी सोलापूर न्यायालयात कलम 313 मध्ये दिलेल्या जबाबात ही माहिती उघडकीस आली असून मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास खोटा व हिंदू दहशतवादाचे खोटे कथानक पसरवण्यासाठीच होता असा युक्तिवाद ऍड सांगळे यांनी केला न्यायालयाने हा युक्तिवाद ऐकून घेत या प्रकरणाची सुनावणी उद्या शुक्रवारी ठेवली.
एटीएसच्या आरोपपत्रात जिवंत
माजी एटीएस अधिकारी मुजावर यांनी आधीच मीडियाला माहिती देताना सांगितले की, संदीप डांगे आणि रामचंद्र कलसांग्रा एटीएसच्या कोठडीत ठार झाले होते. परंतु विशेष एनआयए न्यायालयात दाखल केलेल्या एटीएसच्या आरोपपत्रात त्या दोघांना जिवंत दाखवण्यात आले असून एटीएसला ते हवे आहेत असा युक्तिवाद अॅड. सांगळे यांनी आज न्यायालयात केला.