आम्ही प्रिय मित्र गमावला! डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने जगभरात हळहळ; अमेरिका, रशिया आणि चीन या महासत्तांकडून आदरांजली

हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि आर्थिक सुधारणांचे शिल्पकार डॉ. मनमोहन सिंग यांच्या निर्वाणाबद्दल जगभरातून हळहळ व्यक्त होत आहे. आम्ही प्रिय मित्र गमावला… अशा शब्दांत अमेरिका, रशिया आणि चीन या महासत्तांसह कॅनडा, फ्रान्स, श्रीलंका आदी देशांनी मनमोहन सिंग यांना आज आदरांजली अर्पण केली. या देशांच्या नेत्यांनी मनमोहन सिंग यांच्याशी असलेले मित्रत्वाचे नाते, दोन देशांमधील त्यांच्या पुढाकाराने झालेले द्विपक्षीय करार, हिंदुस्थानच्या आर्थिक प्रगतीप्रती असलेली कटिबद्धता, निर्णयक्षमता याबद्दलच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला.

डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान असताना जगभरातील देशांबरोबर हिंदुस्थानचे संबंध वृद्धिंगत करण्यास प्राधान्य दिले होते. विशेषतः आशिया खंडातील देशांबरोबरचे नाते त्यांनी अधिक घट्ट केले. त्या माध्यमातून त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर हिंदुस्थानची प्रतिमा उंचावली. विविध देशांबरोबर व्यापारी संबंध प्रस्थापित करून आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाच्या आर्थिक विकासाला चालना दिली. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल अफगाणिस्तान, मालदीव, मॉरिशस आणि नेपाळमधील नेत्यांनीही श्रद्धांजली अर्पण केली.

ऐतिहासिक अध्याय रचणारे नेते – अमेरिका

डॉ. मनमोहन सिंग यांनी हिंदुस्थान-अमेरिका द्विपक्षीय कामगिरीचा पाया रचला असे सांगत, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी सिंग यांचा हिंदुस्थान-अमेरिका संबंधांचे महान समर्थक असा उल्लेख केला आहे. सिंग यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका-हिंदुस्थानमध्ये झालेल्या अणु सहकार्य कराराने दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ झाले आणि त्या माध्यमातून मोठी गुंतवणूक झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

  • हिंदुस्थानने एक उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व आणि फ्रान्सने सच्चा मित्र गमावला, अशी भावना फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांनी व्यक्त केली आहे.
  • डॉ. मनमोहन सिंग एक दयाळू आणि परोपकारी तसेच मालदीवचे अत्यंत जवळचे मित्र होते, असे मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद यांनी म्हटले आहे.

हिंदुस्थान-चीनमधील विकासासाठी सकारात्मक योगदान – चीन

डॉ. मनमोहन सिंग हे हिंदुस्थानचे सर्वोत्कृष्ट नेते, अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी हिंदुस्थान आणि चीनमधील विकासात्मक संबंध अधिक दृढ होण्यासाठी सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण योगदान दिले, असे चीनने म्हटले आहे. त्यांच्या कार्यकाळात झालेले विविध द्विपक्षीय करार दोन्ही देशांसाठी महत्त्वपूर्ण ठरले. तसेच दोन्ही देशांमध्ये शांतता आणि समृद्धीसाठी त्यांनी प्रचंड काम केले. हिंदुस्थान-चीन सीमेबाबतचे प्रश्न त्यांनी धोरणात्मक निर्णय घेऊन सोडवले, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी सांगितले.

अर्थशास्त्रज्ञ गमावला – रशिया

मनमोहन सिंग यांचे आपल्यात नसणे ही रशियासाठी अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे. त्यांचे हिंदुस्थान आणि रशियातील द्विपक्षीय संबंध, करार, व्यवहारांसाठी अतुलनीय योगदान राहिले. त्यांची उत्कृष्ट अर्थशास्त्रज्ञ म्हणून असलेली ओळख जगभरात कौतुकाचा विषय राहील, असे रशियाचे वाणिज्य राजदूत डेनिस अलीपोव यांनी म्हटले आहे.

दूरदर्शी नेता गमावला – श्रीलंका

हिंदुस्थानने आणि जगाने एक दूरदर्शी नेता गमावला अशा शब्दांत श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा दिसानायके यांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सिंग यांच्यातील मानवता, विद्वत्ता आणि जनसेवेप्रति असलेली कटिबद्धता पुढच्या पिढ्यांना सदैव प्रेरणादायी ठरेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

मोदी, अमित शहा, सोनिया गांधी, खरगे यांनी वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या नेत्यांनी आज मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

मंत्रिमंडळ बैठकीत शोकप्रस्ताव मंजूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मंजूर करण्यात आला. यावेळी दोन मिनिटांचे मौन पाळून सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शोकप्रस्ताव वाचून दाखवण्यात आला. मनमोहन सिंग यांनी आपल्या राष्ट्रीय जीवनावर त्यांच्या कार्याची छाप सोडली. देशाने प्रख्यात राजकारणी, अर्थतज्ञ गमावला, असे शोकप्रस्तावात म्हटले आहे.

स्मारकासाठी जागा द्या – मल्लिकार्जुन खरगे

डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी दिल्लीत जागा देण्याची मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार करणे आणि त्यांचे स्मारक उभारणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन मल्लिकार्जुन खरगे यांनी केले आहे.

काँग्रेस कार्यकारिणीची आज बैठक झाली. बैठकीत शोक प्रस्ताव मंजूर करण्यात आला आणि डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश, के.सी. वेणुगोपाल, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी आदी उपस्थित होते. बैठकीत शोक प्रस्ताव वाचण्यात आला.

पंतप्रधान असताना केले 72 परदेश दौरे

डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान असताना सुमारे 72 परदेश दौरे केले. यात त्यांनी सर्वाधिक वेळा अमेरिकेला भेट दिली. पहिल्या थायलंड दौऱयात त्यांनी ब्रिमस्टेक शिखर परिषदेत सहभाग घेतला.

अंत्यसंस्कारासाठी राजघाटावर जागा नाकारली

डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी केंद्र सरकारने राजघाटावर जागा नाकारली. दिल्लीच्या निघमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने संरक्षण विभागाला दिले आहेत. त्याला काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते. त्यांच्या पदानुसार त्यांचा सन्मान राखायला हवा. त्यांचे अंत्यसंस्कार आणि स्मारक यमुना नदीकिनारी राजघाटावरच व्हायला हवे, अशी मागणी काँग्रेसने केंद्राकडे केली आहे. यापूर्वीच्या दिवंगत पंतप्रधानांची स्मारकेही राजघाटावर आहेत.

आज सकाळी 9.30 वाजता अंत्ययात्रा

मनमोहन सिंग यांची अंत्ययात्रा उद्या शनिवार, 28 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयातून काढण्यात येईल. त्यांचे पार्थिव सकाळी 8 वाजता त्यांच्या निवासस्थानातून काँग्रेस मुख्यालयात आणले जाईल. तिथे 8.30 ते 9.30 पर्यंत त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे.