फडणवीसांचे मित्र प्रवीण परदेशींची मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती, मुख्य आर्थिक सल्लागारपदी वर्णी

मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त आणि ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात रुजू होणार आहेत. त्यांच्यासाठी ‘मुख्य आर्थिक सल्लागार’ हे विशेष पद तयार करण्यात आले आहे. परदेशी यांच्या नियुक्तीचा आदेश लवकरच जारी करण्यात येणार आहे.

प्रवीण परदेशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून ओळखले जातात. 2014 मध्ये मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर फडणवीस यांनी परदेशी यांची मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती केली होती. मुख्यमंत्री कार्यालयात काम केल्यानंतर परदेशी यांची बदली मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून करण्यात आली होती. त्यानंतर प्रवीण परदेशी हे संयुक्त राष्ट्रात प्रतिनियुक्तीवर गेले. 2021 मध्ये मुख्य सचिव पदाची संधी हुकल्याने त्यांनी सनदी सेवेतून स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली. मात्र 2022 महायुतीचे सरकार आल्यावर परदेशी पुन्हा सक्रिय झाले. राज्य सरकारची ‘थिंक टँक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मित्रा’ या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी परदेशी यांना संधी मिळाली. राज्य सरकारने त्यांची अलीकडेच मुंबई हेरिटेज कॉन्झर्वेशन समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक केली आहे.