
माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना ई-मेलद्वारे धमकी आली आहे. रात्री उशिरा याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची गेल्या वर्षी गोळ्या झाडून हत्या केली होती. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर माजी आमदार झिशान सिद्दिकी यांनी मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांची भेट घेतली होती. मुंबई पोलिसांनी झिशान यांना सुरक्षा पुरवली आहे. गेल्या तीन दिवसांपासून झिशान यांना डी पंपनीच्या नावाने धमकीचे ई-मेल येत आहेत. ई-मेलवरून झिशान यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली जात आहे. झिशान यांच्याकडून पैसे देखील मागितल्याचे समजते. त्या धमकीच्या ई-मेलची माहिती झिशान यांनी मुंबई पोलिसांना दिली. त्यानंतर वांद्रे पोलिसांचे पथक झिशान यांच्या घरी पोहचले. तो धमकीचा ई-मेल कुठून आला आहे, त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. रात्री उशिरा वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.