किनवट माहूर तालुक्याचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे निधन

किनवट माहूर तालुक्याचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे हैदराबाद येथे सकाळी पाचच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 69 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, नातू नातवंड असा परिवार आहे

तालुक्यातील दहेली तांडा येथे सुमिताबाई हेमसिंग जाधव नाईक यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. काही वर्ष ते तेलंगणातील आदिलाबाद येथे कापसाचा व्यवसाय करत होते. त्यांनी सर्वप्रथम1999 ची किनवट माहूर विधानसभा लढविली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. मात्र त्यानंतर त्यांनी पाच वर्षे अथक परिश्रम घेत गाव, वाडी, तांडे, पाडे, गुडे फिरून 2004च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत सलग ते पंधरा वर्षे आमदार राहिले.

 प्रदीप नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी एकनिष्ठ राहत आपली विधानसभेतच नव्हे तर महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा अल्पशा मताने पराभव झाला तरी त्यांनी खचून न जाता गावागावात जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या होत्या. किनवट माहूर तालुक्यात त्यांची प्रतिमा एक प्रेमळ व सर्वांशी मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून होती. त्यांच्या निधनाने सकाळी पाच वाजल्यापासूनच शहरासह ग्रामीण भागात एक सच्चा नेत्याने जगाचा निरोप घेतला असल्याने हळहळ व्यक्त करत आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या दि.2 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता दहेली तांडा येथे मूळ गावी अंतिम संस्कार होणार असल्याचे कळाले आहे.