आरोग्य विभागातील 3200 कोटींच्या कामांना स्थगिती, मिंध्यांना फडणवीसांचा धक्के पे धक्का; माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिंधे गटाला धक्क्यावर धक्के द्यायला सुरुवात केली आहे. फडणवीस यांनी मिंधे सरकारच्या काळातील अनेक निर्णय रद्द केले तर अनेक प्रकल्पांना आतापर्यंत स्थगिती दिली. आजही त्यांनी एक जोरदार झटका दिला. मिंधे सरकारच्या काळात निर्णय घेण्यात आलेल्या आरोग्य विभागातील 3200 कोटी रुपयांच्या कामांना फडणवीस यांनी स्थगिती दिली. या कामांसाठी काढलेली टेंडर्सची रक्कम फुगवून माजी मंत्री तानाजी सावंत यांनी घोटाळा केल्याचा संशय आहे.

मिंधे सरकारच्या काळात तानाजी सावंत हे आरोग्य मंत्री होते. त्यांच्या कारकीर्दीत अधिकाऱ्यांच्या बदल्या, अॅम्ब्युलन्सच्या खरेदीमध्ये हजारो कोटींचे घोटाळे झाले होते. आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य पेंद्रे आणि उपपेंद्रांची बाह्य यंत्रणेद्वारे यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी वार्षिक 638 कोटींप्रमाणे पाच वर्षांसाठी सुमारे 3 हजार 190 कोटी रुपयांची कामे तानाजी सावंत यांनी पुणे येथील एका खासगी कंपनीला 30 ऑगस्ट 2024 रोजी मंजूर केली गेली होती.

कामाचा अनुभव नसतानाही दिले होते कंत्राट

त्या कंपनीला यांत्रिकी साफसफाईच्या कामांचा कोणताही अनुभव नसताना राज्यभरातील रुग्णालयांची जबाबदारी देण्यात आली होती. विशेष म्हणजे याआधी या कामासाठी वर्षाला केवळ 70 कोटी रुपये खर्च येत होता. यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करण्यासाठी आवश्यक निधी राज्यस्तरावर उपलब्ध नाही. तो उपलब्ध होईपर्यंत नव्याने स्वच्छता सेवा सुरू करण्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये, असे निर्देश आरोग्य सेवा आयुक्तालयाने दिले आहेत.

n कोणत्याही रुग्णालयात विनापरवानगी नव्याने स्वच्छता सेवा सुरू होणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी, असेही स्पष्ट निर्देशही आरोग्य सेवा उपसंचालक, सर्व जिल्हा शल्य चिकित्सक आणि वैद्यकीय अधीक्षकांना देण्यात आले आहेत. राज्यभरातील रुग्णालयांच्या स्वच्छतेसाठी वर्षाकाठी केवळ 70 कोटी रुपये म्हणजेच पाच वर्षांत 350 कोटींहून अधिक खर्च येणे अपेक्षित नाही. तरीही 3 हजार 200 कोटींचे अंदाजपत्रक दाखवून निविदा काढल्या गेल्याचे समोर आले आहे.