पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातची भरभराट करण्यासाठी आणि आपला मित्र गौतम अदानी यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मोदींनी आपली अदानी यांच्याशी भेट घालून दिली होती. तसेच गुजरातमध्ये बोलावून त्यांच्या विविध प्रकल्पांबद्दल माहिती दिली होती, असा खुलासा करणारा व्हिडिओच केनियाचे माजी पंतप्रधान रैला ओडिंगा यांनी एक्सवरून प्रसिद्ध केला आहे. हा व्हिडीओ आता तुफान व्हायरल झाला असून यावरून विरोधकांनी मोदींना घेरण्यास सुरुवात केली आहे.
मोदी यांनी अदानी यांच्या विविध प्रकल्पांबाबत माहिती दिली होती तसेच त्यांनी अनेक कंपन्यांमध्येही नेले होते असा दावा ओडिंगा यांनी केला आहे. या भेटीनंतर मोदींनी केनियाच्या शिष्टमंडळाला गुजरातमध्ये बोलावून अदानींच्या बिझनेसबद्दल आणि तत्कालिन तसेच आगामी प्रकल्पांबद्दल सविस्तर माहिती दिली होती असेही ओडिंगा यांनी म्हटले आहे. मोदी यांनी केनिया सरकारच्या शिष्टमंडळाला गुजरातमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. तसेच अदानी यांच्या विविध कंपन्या आणि प्रकल्पांबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली. यात बंदरे, वीजप्रकल्प, रेल्वे मार्ग आणि हिंदुस्थान सरकारची अनेक विकासकामे यांचा समावेश होता. मी अदानी समुहाबद्दलच बोलत आहे, असे सांगताना ओडिंगा व्हिडीओत दिसत आहेत.
मोदी अदानींचे एजंट असल्यासारखे वागत आहेत – काँग्रेस
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अदानींचे एजंट असल्यासारखे वागत आहेत, त्यांचे मार्केटिंग करत आहेत, असा सणसणीत आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने ओडिंगो यांचा व्हिडीओ एक्सवरून शेअर केला असून मोदींच्या गुजरातधार्जिण्या धोरणाचे वाभाडे काढले आहेत. केनियाच्या माजी पंतप्रधानांचा खुलासा अत्यंत गंभीर आहे. यावरून मोदी कशाप्रकारे आपले मित्र गौतम अदानी यांच्यासाठी एजंटासारखे काम करत आहेत हेच सिद्ध झाले आहे. मोदी परदेशातही अदानींचे मार्केटिंग करतात आणि त्यांना अब्जावधींचे डील करून देतात असा आरोपही काँग्रेसने केला आहे. यावरून मोदींचा साफ फंडा आहे. परदेशात जाईन, मित्राला व्यवसाय मिळवून देईन आणि प्रचंड श्रीमंत बनवीन असा टोलाही काँग्रेसने एक्सवरून लगावला आहे.