
महाराष्ट्रातील क्रीडापटूंसाठी लॉरियस क्रीडा पुरस्कार असा लौकिक असलेल्या ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारा’च्या दोन वर्षांपासून रखडलेल्या पुरस्काराच्या वितरणाला गुड फ्रायडेचाच मुहूर्त मिळाला आहे. माजी राष्ट्रीय कबड्डीपटू, संघटक शकुंतला खटावकर यांची 2023-24 सालच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे राज्याच्या क्रीडा खात्याकडून जाहीर करण्यात आले. तसेच पॅरा ऑलिम्पिक पदक विजेता सचिन खिलारी, जागतिक तिरंदाज आदिती स्वामी, क्रिकेटपटू शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैसवाल यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा थेट पुरस्काराने गौरवित केले जाणार आहे. येत्या शुक्रवारी 89 पुरस्कार विजेत्यांचा राज्याच्या क्रीडा विभागाकडून सन्मान केला जाणार आहे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देदीप्यमान यश संपादणाऱ्या खेळाडूंची राज्य पुरस्कारांसाठी निवड करताना नेहमीच सावळागोंधळ आणि वशिलेबाजी होत असल्याचे वारंवार उघडकीस आले आहे. त्यामुळे यंदा राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर करताना क्रीडा खात्याने सर्वतोपरीने सावधगिरी बाळगण्याचा प्रयत्न केला आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या पुरस्कार वितरण सोहळय़ात हा पुरस्कार शिवजयंती दिनीच होणार असल्याचे छातीठोकपणे जाहीर करण्यात आले होते; पण नेहमीचाच गोंधळ यामुळे गेले काही वर्षे हा पुरस्कार सोहळा दर तीन-चार वर्षांनीच उरकण्याची नामुष्की राज्य क्रीडा खात्यावर ओढवली आहे.
मुंबईत आज शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारासह उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक-जिजामाता पुरस्कार, खेळाडूंसाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, दिव्यांग खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अशा एकूण 89 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. 18 खेळाडूंना थेट पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जीवन गौरवसाठी 5 लाख, शिवछत्रपती पुरस्करासाठी 3 लाख रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 2001 पासून शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्काराची परंपरा सुरू झाली. पुरस्कार सुरू झाल्यापासून यंदा प्रथमच महिला खेळाडू शकुंतला खटावकर या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. 1979 ते 1982 कालावधीत 106 राष्ट्रीय कबड्डी लढती खेळण्याचा विक्रम खटावकर यांनी केला होता. खटावकर यांनी राष्ट्रीय स्पर्धेत तब्बल 8 वेळा महाराष्ट्रासाठी विजेतेपद जिंकले आहे. महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या त्या उपाध्यक्ष आहेत. 1978 मध्ये केंद्र शासनाच्या अर्जुन पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता.
क्रिकेटपटूंवर पुरस्कारांचा वर्षाव
गेल्यावर्षी म्हणजे 2022-23 या सालात क्रिकेटच्या एकाही खेळाडूला पुरस्कार देण्यात आला नव्हता. मात्र यंदा 7 क्रिकेटपटूंना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महिलांमध्ये जेमिमा रॉड्रिग्ज आणि देविका वैद्य या दोघींना पुरस्कार मिळाला आहे तर पुरूषांमध्ये यशस्वी जैसवाल, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी आणि जितेश शर्मा या पाच जणांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे शरीरसौष्ठवासाठी एकाही खेळाडूला पुरस्कार मिळू शकलेला नाही. त्याचप्रमाणे कबड्डी महिलांमध्येही कुणाचेही नाव जाहीर न झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
‘सामना’चे वृत्त खरे ठरले
राज्य क्रीडा खात्याचा दोन वर्षे रखडलेला क्रीडा पुरस्कार सोहळा येत्या शुक्रवारी गुड फ्रायडेच्या मुहूर्तावर सन्मानाने उरकला जाणार असल्याचे वृत्त दैनिक ‘सामना’ने 10 एप्रिलला दिले होते. अखेर ते वृत्त खरे ठरले असून 18 एप्रिलला सकाळी 11 वाजता पुण्याच्या म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजकीय क्षेत्रातील दिग्गजही उपस्थित राहणार आहेत.
शेवटच्या श्वासापर्यंत कबड्डीसाठीच झटेन
गेली पाच दशके कबड्डीसाठी केलेल्या खेळाचा आणि कामाचा राज्य शासनाने सन्मान केला आहे. मी आतापर्यंत कबड्डीच्या प्रगतीसाठी आणि प्रचारासाठीच झटत आलीय आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी कबड्डीसाठीच झटेन. हा सन्मान माझ्या कार्याला नक्कीच ऊर्जा देणार आहे. – शंकुतला खटावकर
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार – 2023-24
शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार – शकुंतला खटावकर (पुणे), उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/जिजामाता पुरस्कार सन 2023-24
जिम्नॅस्टिक्स – प्रवीण ढगे (पुणे), कुस्ती – गोविंद पवार (पुणे) (थेट पुरस्कार), शिवशंकर भावले (लातूर), खो-खो – प्रवीण बागल (धाराशीव), दिव्यांग खेळांचे क्रीडा मार्गदर्शक – मानसिंग पाटील (कोल्हापूर) (पॅरा जलतरण), दिव्यांग खेळांचे क्रीडा मार्गदर्शक थेट पुरस्कार – रचना धोपेश्वर (पॅरा ज्युदो) (पुणे), थेट पुरस्कार (द्रोणाचार्य पुरस्कारार्थी मल्लखांब) – गणेश देवरूखकर (मुंबई उपनगर);
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (थेट पुरस्कार खेळाडू)
आर्चरी – आदिती स्वामी (सातारा), ओजस देवतळे (नागपूर), प्रथमेश जवकार (बुलढाणा), ऍथलेटिक्स – ऐश्वर्या मिश्रा (मुंबई उपनगर), बॅडमिंटन – चिराग शेट्टी (मुंबई उपनगर)
क्रिकेट – जेमिमा रॉड्रिग्ज (मुंबई शहर), राहुल त्रिपाठी (पुणे) देविका वैद्य (पुणे), ऋतुराज गायकवाड (पुणे), शिवम दुबे (मुंबई उपनगर), जितेश शर्मा (अमरावती), यशस्वी जयस्वाल (मुंबई शहर), अश्वारोहण – हृदय छेडा (मुंबई उपनगर), हॉकी – वैष्णवी फाळके (सातारा), कबड्डी – अस्लम इनामदार (अहिल्यानगर), आकाश शिंदे (नाशिक), रोइंग – धनंजय पांडे (रायगड), शूटिंग – किरण जाधव (सातारा),
शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार
जमीन- कृष्णा ढोकले (पुणे),
जल- तन्वी देवरे-चव्हाण (नाशिक)
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू)
ऍथलेटिक्स- मंगला अडम्बर (नागपूर), पॅरा ऍथलेटिक्स- सचिन खिलारी (सांगली) (थेट पुरस्कार), दिलीप गावीत (नाशिक) (थेट पुरस्कार), संगमेश्वर बिराजदार (धाराशीव), चेस (अंध) – संस्कृती मोरे (सातारा) (थेट पुरस्कार), आर्यन जोशी (ठाणे) (थेट पुरस्कार), पॅरा ज्युदो – साक्षी बनसोडे (पुणे) (थेट पुरस्कार), वैष्णवी मोरे (पुणे) (थेट पुरस्कार), पॅरा शूटिंग- संतोष गाढे (पुणे) (थेट पुरस्कार).
इतर खेळ प्रकार
पॅरा सायकलिंग- ज्योती गडेरिया (भंडारा), बॅडमिंटन- प्रेमकुमार आळे (पुणे).
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू)
जलतरण वॉटरपोलो – सांजली वानखडे (अमरावती), उदय उत्तेकर (ठाणे), धनुर्विद्या (आर्चरी) – मंजिरी अलोणे (अमरावती), यशदीप भोगे (अमरावती), ऍथलेटिक्स – यमुना लडकत (पुणे), किरण भोसले (कोल्हापूर), बॅडमिंटन – अक्षया वारंग (मुंबई शहर)
मुष्टीयुद्ध (बॉक्सिंग) – अजय पेंडोर (नांदेड), तलवारबाजी – श्रुती जोशी (नागपूर), धनंजय जाधव (सांगली), कॅनोइंग व कयाकिंग – अंकुश पोवटे (सांगली), सायकलिंग – ऋतिका गायकवाड (नाशिक), मयूर पवार (सातारा), जिम्नॅस्टिक्स (आर्टिस्टिक्स) – ईशिता रेवाळे (मुंबई उपनगर), रिदमिक जिम्नॅस्टिक्स – संयुक्ता काळे (ठाणे), जिम्नॅस्टिक्स (ट्रम्पोलिन) – राही पाखले (ठाणे), आदर्श भोईर (ठाणे), ज्युदो – श्रद्धा चोपडे (छत्रपती संभाजीनगर), रग्बी – कल्याणी पाटील (कोल्हापूर), पृथ्वीराज पाटील (कोल्हापूर), रोईंग – मृण्मयी साळगावकर (नाशिक), विपुल घुरडे (अमरावती), स्पोर्ट्स क्लायबिंग – सानिया शेख (पुणे), स्क्वॅश – राहुल बैठा (ठाणे), टेबल टेनिस – स्वस्तिका घोष (ठाणे), ट्रायथलॉन – मानसी मोहिते (रायगड), वेटलिफ्टिंग – दीपाली गुरसाळे (सांगली), अभिषेक निपाणी (कोल्हापूर), कुस्ती – सृष्टी भोसले (कोल्हापूर), तुषार दुबे (पुणे), स्केटिंग – स्नेहा तायशेटे (मुंबई उपनगर), जिनेश नानल (पुणे), वुशू – तृप्ती चांदवडकर (पुणे), ऋषिकेश मालोरे (रायगड), सॉफ्टबॉल- ऐश्वर्या पुरी (कोल्हापूर), प्रितीश पाटील (जळगाव), बेसबॉल – रेखा धनगर (जळगाव), प्रदीप पाटील (मुंबई शहर), कबड्डी- पूजा यादव (मुंबई शहर), शंकर गदाई (अहिल्यानगर), खो-खो- गौरी शिंदे (धाराशीव), ऋषिकेश मुरचावडे (मुंबई उपनगर), मल्लखांब – शुभंकर खवले (मुंबई उपनगर), आटय़ापाटय़ा – शिल्पा डोंगरे (धाराशीव), योगासन – छकुली सेलोकर (नागपूर), वैभव श्रीरामे (नागपूर), कॅरम- आकांक्षा कदम (रत्नागिरी), योगेश घोंगडे (नागपूर).