कोठडीतील मृत्यूप्रकरणी माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांची निर्दोष मुक्तता

आरोपीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याप्रकरणी तुरुंगात असलेले माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांची आज गुजरातमधील पोरबंदर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. न्यायदंडाधिकारी मुकेश पंड्या यांनी पुराव्यांअभावी संजीव भट्ट यांना निर्दोष जाहीर केले आहे.

1990 साली जामनगरमध्ये हिंदुस्थान बंद दरम्यान हिंसाचार झाला होता. भट्ट हे त्यावेळी जामनगरचे पोलीस अधीक्षक होते. या हिंसाचारात 25 जण जखमी झाले होते. पोलिसांनी त्यावेळी 133 जणांना ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतलेल्यांमध्ये प्रभूदास वैश्नानी याचाही समावेश होता. वैश्नानीचा न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले असताना त्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला होता. भट्ट यांच्याविरोधात खटला दाखल करण्याची त्यावेळी मागणी करण्यात आली होती, मात्र ही मागणी त्यावेळी सरकारने फेटाळली होती. 2011 साली गुजरात सरकारने भट्ट यांच्याविरोधात खटला चालवण्याची परवानगी दिली होती.