एका वर्षाच्या आतमध्ये मोदी पदावरून हटतील-सत्यपाल मलिक

शेतकऱ्यांना एमएसपी देण्यास मोदी सरकार अपयशी ठरले असून, मोदींनी लष्करात अग्निवीर योजना आणून घोळ घातला. त्यात तरुणांना ना पेन्शन मिळेल, ना कायमस्वरूपी नोकरी. मोदींच्या विरोधात देशभरात लाट असून, मी तुम्हाला खात्री देतो की ‘नरेंद्र मोदी हे एका वर्षाच्या आतमध्ये हटतील’, त्यांना संघ हटवेल किंवा इतर कोणी; पण ते पदावरून जातील, असे मत जम्मू आणि कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी व्यक्त केले.

‘भारत जोडो अभियान’च्या वतीने आयोजित केलेल्या ‘निर्धार महाराष्ट्राचा, लोकशाही, संविधान आणि महाराष्ट्र वाचवा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ कामगारनेते डॉ. बाबा आढाव, तुषार गांधी, ज्येष्ठ कायदेतज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे, भारत जोडो यात्रेच्या राज्य समन्वयक उल्का महाजन, पुलवामा सत्य चळवळीचे निमंत्रक फिरोज मिठीबोरवाला आदी उपस्थित होते.

मलिक म्हणाले, माझ्या माहितीनुसार अदानीने हरयाणामध्ये मोठमोठी गोडाऊन उभारून धान्याने भरविली आहेत. त्यामुळे एमएसपी लागू केल्यास अदानी बाजाराला कंट्रोल करू शकत नाहीत, त्यामुळेच आजपर्यंत या सरकारने एमएसपी लागू केली नसल्याची टीका मलिक यांनी केली. मोदी हे शेतकरी, लष्करात दाखल होणाऱ्या तरुणांचे करिअर संपवित आहेत. हरयाणात काँग्रेस 60 जागा, तर 20 जागा भाजप जिंकेल, असेही ते म्हणाले.

तुषार गांधी म्हणाले, एमएसपी दिली नाही तर शेतकरी मोदींना परत पाठवतील. सहनशक्तीपेक्षा जास्त झाल्यावर देशातील शेतकरी क्रांती करतील. या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार केला. ज्यांच्या नावावर राजकारण केले त्या राममंदिर निर्माणामध्ये यांनी भ्रष्टाचार केला. डॉ. बाबा आढाव म्हणाले, ज्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला ते सरकार इथे राहणार नाही. त्यासाठी आपल्याला मोठ्या सत्याग्रहाची तयारी करावी लागेल. सरकारचा अन्याय वाढायला लागला तर आपल्याला रस्त्यावर उतरावे लागेल.

अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आम्ही महविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. मात्र, आता विधानसभेला आम्ही सशर्त पाठिंबा देणार आहोत. तुम्ही निवडून आल्यावर काय करणार हे आम्हाला सांगा. निवडून आलेले लोक जर काम करणार असतील तरच आम्ही पाठिंबा देऊ. यावेळी उल्का महाजन, फिरोज मिठीबोरवाला यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शोभा करंडे यांनी आभार मानले.