
ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाचे माजी प्रमुख संजय कुमार मिश्रा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आर्थिक सल्ला देताना दिसणार आहेत. कारण आर्थिक सल्लागार परिषदेचे सचिव म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. 2018 मध्ये दोन वर्षांच्या कालावधीसाठी मिश्रा यांना ईडीच्या संचालकपदावर नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर सरकारने त्यांना अनेकदा मुदतवाढ दिली, मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दणक्यानंतर मिश्रा यांना 2023 मध्ये पदावरून पायउतार व्हावे लागले.
या नेत्यांची केली होती चौकशी
मिश्रा यांच्या कार्यकाळात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, जम्मू-कश्मीरचे विद्यमान मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि पश्चिम बंगालचे माजी शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांची चौकशी झाली होती.