
शिवसेनेच्या माध्यमातून कांदिवली, चारकोप परिसरात नव्वदीच्या दशकापासून काम करणारे, अनेक आंदोलनात आघाडीवर राहणारे आणि अखेरपर्यंत शिवसेनेशी निष्ठावंत राहणारे शिवसेनेचे माजी विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे शिवसेनेसह विविध स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
सुधाकर सुर्वे यांनी 1990 मध्ये शाखाप्रमुखपदापासून पक्षबांधणीचे काम केले. ‘म्हाडा’ वसाहतींमध्ये मोठय़ा प्रमाणात वास्तव्यास येणाऱया नागरिकांमध्ये शिवसेनेची ताकद वाढवली. 1995 मध्ये युती सरकार असताना चारकोपमधील वसाहतींना ‘प्रबोधनकार ठाकरे नगर’ असे नाव देण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला. उपविभागप्रमुख म्हणूनही कार्यक्षमपणे काम केले. शिवाय 2007 ते 2018 या कालावधीत त्यांनी शिवसेना भवन येथेही काम केले. यानंतर 2018 पासून 2022 पर्यंत विभागप्रमुख ही महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली. शिवसेना वाढीसाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्र पिंजून काढत मेळावे घेऊन शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण केले. विभागात बेस्ट सुविधा सुरू करण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले. कोरोना काळात त्यांनी स्वतःच्या प्रकृतीची तमा न बाळगता अनेकांना लागेल ती मदत करून अनेकांचे जीव वाचवण्याचे काम केले. पूरग्रस्तांना मदत, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून प्रोत्साहन, गरजूंना मदत, मोफत आरोग्य शिबिरे असे उपक्रम ते वेळोवेळी घेत असत. त्यांच्याच पुढाकाराने कांदिवली-कुडाळ-बांदा व कांदिवली-देवगड- अशा एसटी बसेसही सुरू झाल्या. सुधाकर सुर्वे यांच्याच पाठपुराव्यामुळे पी/उत्तर मालाड विभाग मालाड पश्चिम येथील न.भू.मा.क्र. 2841 येथील खेळाच्या मैदानाला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे नाव देण्यात आले.