नगर अर्बन बँक कर्ज घोटाळाप्रकरणी दाखल गुह्यात गेल्या 9 महिन्यांपासून अटकेत असलेले बँकेचे माजी संचालक अनिल चंदुलाल कोठारी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती एस. जी. मेहेरे यांनी हा जामीन मंजूर केला.
अर्बन बँक कर्ज घोटाळाप्रकरणी बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुह्यात बँकेचे माजी संचालक अनिल कोठारी यांना 23 जानेवारी 2024 रोजी पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून ते कोठडीत होते. कोठारी यांनी जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, तो फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यांनी ऍड. आर. आर. करपे यांच्यामार्फत मुंबई उच न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायमूर्ती एस. जी. मेहेरे यांच्यासमोर सुनावणी झाली. न्या. मेहेरे यांनी कोठारी यांना 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. जामीन मंजूर करताना कोठारी यांनी बँकेच्या अवसायकाच्या कामकाजात हस्तक्षेप करू नये, न्यायालयाच्या परवानगीशिवाय शहर सोडू नये, पासपोर्ट न्यायालयात जमा करावा, बँकेच्या कामकाजात कुठलाही हस्तक्षेप करू नये, अशा अटी न्यायालयाने घातल्या आहेत.