
माजी उपमुख्यमंत्री रामराव आदिक यांच्या निधनानंतर खोटी कागदपत्रे सादर करून त्यांची पेन्शन लाटल्याचा आरोप असलेल्या डा. लेखा पाठक यांच्याविरोधात मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शेवटच्या दिवसांमध्ये आदिक हे डॉ. पाठक यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.
आदिक यांची पेन्शन त्यांच्या खऱ्या पत्नीला न मिळता डॉ. पाठक यांना मिळत असल्याची बाब आदिक कुटुंबीयांच्या निदर्शनास आली. याची तक्रार त्यांनी पोलिसांत केली. मात्र पोलीस याचा गुन्हा नोंदवून घेत नव्हते. अखेर त्यांनी महानगर दंडाधिकारी न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली. त्यावरही निर्णय होत नव्हता. त्यामुळे आदिक यांचा मुलगा पृथ्वीराज यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
उच्च न्यायालयाने पृथ्वीराज यांच्या तक्रारीवर चार आठवडय़ांत निर्णय घेण्याचे आदेश दंडाधिकारी न्यायालयाला दिले. त्यानुसार दंडाधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे निर्देश पोलिसांना दिले. त्यानंतर पोलिसांनी याचा गुन्हा नोंदवला.
काय आहे प्रकरण…
1996 मध्ये आदिक यांनी आजारपणामुळे राजकारणातून निवृत्ती घेतली. हृदयविकारासाठी डॉ. पाठक आदिक यांच्यावर उपचार करत होत्या. नंतर आदिक हे डॉ. पाठक यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. 20 ऑगस्ट 2007 मध्ये आदिक यांचे निधन झाले. त्यानंतर डॉ. पाठक यांनी सादर केलेल्या मृत्युपत्रावरून वाद झाला. त्यावर सामोपचाराने तोडगा निघाला. मात्र आदिक यांची सरकारी पेन्शन डॉ. पाठक यांना मिळत असल्याचे आदिक कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. याचा गुन्हा नोंदवण्यासाठी आदिक कुटुंबीयांना न्यायालयीन लढा लढवावा लागला.
विधिमंडळात सादर केली कागदपत्रे
आदिक यांची पेन्शन मिळावी यासाठी डॉ. पाठक यांनी विधिमंडळात कागदपत्रे सादर केली. मीच आदिक यांची पत्नी असल्याचा दावा डॉ. पाठक यांनी या कागदपत्रांद्वारे केला. मुळात आदिक यांचा माझी आई शोभा यांच्याशी विवाह झाला आहे. त्यांनाच ही पेन्शन मिळायला हवी, असे पृथ्वीराज यांचे म्हणणे आहे.