दिल्लीत दिवसाढवळ्या हिंसक घटना घडत आहेत. महिलांवरील गुन्हे, खंडणी, ड्रग्जमाफिया आपले बस्तान बसवत आहेत. दिल्लीला क्राइम पॅपिटल होण्यापासून वाचवा, अशी मागणी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून केली आहे.
दिल्लीतील वाढती गुन्हेगारी आणि बिघडत चाललेली कायदा व सुव्यवस्था यावर चिंता व्यक्त करत अरविंद केजरीवाल यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी गृहमंत्र्यांकडे तातडीने वेळ मागितला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी गृहमंत्रालयावर आहे. प्रत्येक गल्लीबोळात खंडणीखोर टोळय़ा आणि गुंड सक्रिय झाले आहेत. मोबाईल आणि चेन स्नॅचिंगने संपूर्ण दिल्ली हैराण झाली आहे. आज गुन्हेगारांची हिंमत एवढी वाढली आहे की, दिल्लीच्या रस्त्यावर गोळीबार, खून, अपहरण, चाकूहल्ला अशा घटना दिवसाढवळ्या घडत आहेत, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. दिल्लीत गेल्या 6 महिन्यांत 300 हून अधिक शाळा-कॉलेज, 100 हून अधिक रुग्णालये, विमानतळ आणि मॉल्समध्ये बॉम्बस्पह्टाच्या धमक्या सातत्याने दिल्या जात आहेत. जेव्हा बॉम्बच्या धमकीमुळे शाळा रिकामी केली जाते आणि मुलांना घरी पाठवले जाते तेव्हा मुलांचे काय हाल होतात याची तुम्ही कल्पना करू शकता, असा सवाल केजरीवाल यांनी केला आहे.