कल खेल में हम हो ना हो… पर हम तुम्हारे रहेंगे सदा…, आयसीयूच्या बेडवरून विनोद कांबळीचे गाणे… चाहते हेलावले

क्रिकेटच्या मैदानावर एकेकाळी धुवाधार बॅटिंग करीत लाखो क्रिकेटप्रेमींची मने जिंकणारा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याची प्रकृती खालावली आहे. त्याला भिवंडीच्या काल्हेर येथील आकृती रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या बेडवरूनच त्याने ‘कल खेल में हम हो ना हो, गर्दीश में तारे रहेंगे सदा’ या मेरा नाम जोकर सिनेमातल्या गाण्याच्या ओळी गायल्या तेव्हा उपस्थितांचे डोळे अक्षरशः पाणावले.

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि 1990च्या दशकातील स्टार फलंदाज विनोद कांबळी सध्या आर्थिक विवंचनेत आहे. विनोद आणि सचिन तेंडुलकर यांचे गुरू रमाकांत आचरेकर यांच्या शिवाजी पार्क येथे उभारलेल्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यात हे दोन मित्र समोरासमोर आले होते. यावेळी विनोदने आचरेकर सरांचे ‘सर जो तेरा चकराये या दिल डुबा जाये’ हे आवडते गाणे गायले. तो व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. आता अस्वस्थ वाटू लागल्याने विनोद कांबळी याला भिवंडी येथील आकृती रुग्णालयात दाखल केले असून आज पुन्हा त्याच्या प्रकृतीची चर्चा सुरू झाली.

विनोदला नेमकं झालं काय?

विनोदला न्यूट्रिशनल आणि युरिनरी प्रॉब्लेम झाला आहे. युरिन इन्फेक्शनमुळे मसल्स क्रॅम्प झाला आहे. त्यामुळे विनोद धड बसूही शकत नाही. त्याच्या या आजाराची माहिती मिळताच आकृती रुग्णालयाचे संचालक शैलेश ठाकूर यांनी त्याला तातडीने आपल्या भिवंडीच्या काल्हेर येथील हॉस्पिटलमध्ये आणून दाखल केले. सध्या तीन डॉक्टरांची टीम त्याच्यावर उपचार करत असून त्याची प्रकृतीही नियंत्रणात आहे. क्रिकेटप्रेमींनी तो लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा तर दिल्याच पण शैलेश ठाकूर यांच्या दयाळूपणाचे भरभरून कौतुकही केले.

आयुष्यभर विनोदवर मोफत उपचार

डॉ. शैलेश ठाकूर हे बालपणापासून क्रिकेटचे चाहते असून त्यांनी विनोद कांबळी याचे अनेक सामने पाहिले आहेत. सोशल मीडियावर कांबळीच्या प्रकृती अस्वास्थ्यतेचा व्हिडीओ पाहिल्यानंतर ठाकूर यांनी त्याच्यावर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःच्या रुग्णालयात दाखल केले. विनोद कांबळी यांचे हिंदुस्थानसाठी क्रिकेटमधले मोठे योगदान आहे. ते महान खेळाडू आहेत. त्यांना मदतीची गरज असल्याने सहकार्य करणे माझे कर्तव्य मानतो, असेही ठाकूर म्हणाले. यापुढे कांबळी यांच्यावर लाईफटाइम सर्व उपचार मोफत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जीना यहां मरना यहां

विनोद कांबळी याला आकृती रुग्णालयात दाखल केल्याची बातमी कळताच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तेथे पोहोचले. त्यांनी विनोदशी संवाद साधून त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यावेळी तो म्हणाला की, माझी प्रकृती सुधारत आहे. रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांमुळे मला बळ मिळाले आहे असे सांगताना विनोदने मेरा नाम जोकर सिनेमातील हे गाणे गुणगुणले तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले. तो म्हणाला…

‘कल खेल में हम हो ना हो,
गर्दिश में तारे रहेंगे सदा
भुलोगे तुम, भुलेंगे हम
पर हम तुम्हारे रहेंगे सदा
रहेंगे यही, अपने निशा
इसके सिवा जाना कहां …