एका वृद्धाच्या मदतीसाठी धारावी पोलीस ठाण्यात गेलेल्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकासोबत तेथील पोलीस निरीक्षकाने निंदनीय कृत्य केले. आपल्या वर्दीचा रुबाब दाखवत त्या निरीक्षकाने धक्काबुक्की करून माजी नगरसेवक वसंत नकाशे यांना मारहाण केली. या घटनेच्या विरोधात संतप्त महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या देत जोरदार आंदोलन केले. निरीक्षकावर कारवाईची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.याची तत्काळ दखल घेत वरिष्ठ अधिकाऱयांनी त्या निरीक्षकाची रवानगी नियंत्रण कक्षात केली.
आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एका वृद्धाचा किरकोळ अपघात झाला. त्यानिमित्ताने त्या वृद्धासोबत माजी नगरसेवक वसंत नकाशे हे धारावी पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी तेथे हजर असलेले पोलीस निरीक्षक हर्षराज आळसपुरे यांची भेट घेतली व घडल्याप्रकाराबाबत दोन्ही बाजूचे बोलणे झाले असून गुन्हा दाखल करायचे नसल्याचे त्यांना सांगितले, मात्र हे ऐकून आळसपुरे संतापले आणि त्यांनी नकाशे यांना धक्काबुक्की करत त्यांना मारहाण केली. यावेळी पोलीस निरीक्षक हर्षराज आळसपुरे यांच्या कृत्याच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन सुरू केले. शिवसेना नेते विनायक राऊत, आमदार अॅड. अनिल परब, खासदार अनिल देसाई, खासदार वर्षा गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात जाऊन परिस्थिती समजून घेतली व संबंधित अधिकाऱयावर कारवाई करण्याची मागणी केली.कार्यकर्त्यांचा संताप व वरिष्ठ नेत्यांनी कारवाईची मागणी केल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी त्याची गंभीर दखल घेतली आणि निरीक्षक हर्षराज आळसपुरे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी केली. वसंत नकाशे यांना मारहाण झाल्याचे कळताच विभाग क्रमांक 10 चे विभागप्रमुख महेश सावंत यांनी लगेच धारावी पोलीस ठाण्याच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर माजी आमदार बाबूराव माने, काँग्रेसचे माजी नगरसेवक दीपक काळे, धारावी विभाग संघटक विठ्ठल पवार तसेच महाविकास आघाडीचे माजी नगरसेवक, शिवेसेनेचे महिला व पुरुष शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, कार्यकर्त्यांसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.