हिंदुस्थानातील निवडणूक घोटाळा हा आंतरराष्ट्रीय कट आहे. मोदी हे केवळ भाजपचे नाहीत, तर या जागतिक कटाचा भाग आहेत. या संपूर्ण कटाला मोसादची मदत आणि सीआयएचे सहकार्य आहे, असा पर्दाफाश काँग्रेसचे माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी आज केला.
मतपत्रिकेवर मतदानासाठी लोकचळवळ या परिषदेचे आयोजन मुंबई पत्रकार संघात करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार केतकर यांनी मतपत्रिकेवर निवडणूक का आवश्यक आहे याचे विस्तृत विश्लेषण केले. ते म्हणाले, आपला संघर्ष केवळ ईव्हीएमपुरता नाही. हा संपूर्ण संघर्ष निवडणूक व्यवस्थापन व कटातून सत्तेत आलेल्या सरकारविरोधात आहे. मिलेटरी इंटलसेट कॉम्लेक्सचा हा एक भाग आहे. त्याद्वारेच सर्व घोटाळे आपल्या देशात घडत आहेत. अदानी हेदेखील या कटाचा भाग आहेत. सर्व एअरपोर्ट व पोर्ट अदानीच्या ताब्यात आहेत. अदानीच्या नावे हे लोक धंदे करत आहेत. हे धंदे उघड होऊ नयेत म्हणून ते अदानीला पाठीशी घालतात. असा आरोप केतकर यांनी केला.
मोदी, शहा प्यादे आहेत…
इस्राइल त्यांच्या सेंट्रल हॉलमधून, कंट्रोल रूममधून पेजरद्वारे बॉम्ब फोडून माणसे ठार मारू शकतात. त्यामुळे ईव्हीएम हॅपिंग हे त्यांच्यासाठी मामुली आहे. ईव्हीएमची टेक्नॉलॉजी हिंदुस्थानात विकसित झालेली नाही. ही टेक्नॉलॉजी मोसादने बनवली आहे. ही मशीन चालवणे मोदी आणि शहांच्या क्षमतेचे कामच नाही. आयोगाची संपूर्ण यंत्रणा मोसादच्या मार्गदर्शनाखाली चालते. त्या मोसादला सीआयएचा पाठिंबा आहे. परिणामी या संपूर्ण यंत्रणेलाचा आव्हान द्यायला हवे. केवळ ईव्हीएमला नाही, असे आवाहन केतकर यांनी केले.
2009 पासूनच कट शिजला
2009 मध्ये काँग्रेसला 206 जागा मिळाल्या मग 2014 मध्ये त्या 44 कशा झाल्या. असे काय झाले, की सर्वच काँग्रेसच्या विरोधात गेले. खरं तर तेव्हाच संशय यायला हवा होता. काँग्रेसवर घोटाळ्याचे आरोप झाले, पण टुजीमध्ये काहीच सापडले नाही. त्यात कोणतेही पुरावे नाहीत असे कोर्टानेही सांगितले. नंतर मोदींचे राज्य आले. त्यांनी कोणालाच अटक का नाही केली? मोसाद आणि त्यांच्या हस्तकांना 2009 मध्ये लक्षात आले काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष सहाजासहजी सत्तेतून जाणार नाहीत, त्यामुळे त्यांनी मतदान यंत्रातच हात घातला. 2014 पासून त्यांनी कट सुरू केला, असे केतकर यांनी सांगितले.
गावागावातून बॅलेटची मागणी करा
लोकशाही, संविधान टिकवण्यासाठी बॅलेट पेपरची शपथ घ्या, जात, धर्म, पंथ सोडून एकत्र या. गावागावातून बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी करा, असे आवाहन निवृत्त न्या. बी. जी. कोळसे-पाटील यांनी केले.
भाजपचं तोंड काळं झालंय
ज्यांना ईव्हीएमवर मतदान करायचे आहे त्यांना तेथे करू द्या, ज्यांना मतपत्रिकेवर मतदान हवे आहे त्यांना तसे मतदान करु द्या. आमचा कशालाही विरोध नाही. भाजपाला डाग नाही लावला तर त्यांचे तोंड काळं झालंय. सर्व काही शक्य. ही लढाई मी जिंकणार आहे, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार उत्तमराव जानकर यांनी केला.
आयोग ईव्हीएमचा डाटा का देत नाहीत – तिस्ता सेटलवाड
डाटा चोरी शोधण्यासाठी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खूप मदत केली. निवडणूक आयोग ईव्हीएमचा डाटा का देत नाहीत? हा सरकारचा नाही, तर जनतेचा डाटा आहे. हा डाटा दिल्यास कोणता राष्ट्रीय धोका आहे हे आयोग सांगत नाही. आम्हाला टक्केवारी नको, तर नेमके आकडे आयोगाने द्यायला हवेत, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी केली.
ईव्हीएममधील घोळाचे प्रात्यक्षिक
यावेळी ईव्हीएमद्वारे कशा प्रकारे घोळ होऊ शकतो याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव डॉ. संजय लाखे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) विद्या चव्हाण, धर्मराज पक्षाचे अध्यक्ष राजन राजे तसेच मारकवाडीचे सरपंच रणजित मारकड उपस्थित होते. या परिषदेचे आयोजन अॅड. अमीन सोलकर, शरद कदम, संतोष आंबेकर, एम. ए. खालिद व गुड्डी यांनी केले.
बाळासाहेबांच्या जयंतीपासून आंदोलनाला सुरुवात
23 जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे. त्या दिवसापासून आंदोलनाला सुरुवात करा. प्रत्येक निवडणूक कार्यालयाला घेराव घाला. मुंबईत पाच लाख लोकांचा मोर्चा काढून तो यशस्वी करायचा आहे, असे आवाहन समाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला यांनी केले.
काहीही करा पण सत्ता हातात घ्या
लाडकी बहीण योजनेमुळे असंख्य महिला प्रभावित झाल्या. भाजपला सगळे मतदारसंघ नकोच आहेत. ज्या मतदारसंघात जिंकण्याची शक्यता असते, तेथेच ते मशीन कॅप्चर करतात. कारण त्यांना बहुमत हवे असते. काहीही करा पण सत्ता हातात घ्या हा मोदींची फॉर्मुला आहे. हरियाणात आणि उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी तेच केले, असा दावा केतकर यांनी केला.
जागतिक धोका
अमेरिकेतसुद्धा आता अशाच प्रकारे निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. आता असा आरोप होतो की तेथे डाव्या सरणीची लोकं विरोध करत आहेत. फ्रान्सपासून अमेरिकेपर्यंत आलेली ही लाट नव्हे तर हा कट आहे. हा नवीन धोरणांचा विरोध आहे. निवडणूक प्रक्रियेत जागतिक सहभाग वाढला आहे. त्याविरोधात ही लढाई आहे. त्यासाठी लोकांनी जागृत व्हायला हवे, असे केतकर म्हणाले.