चिखलीकर-चव्हाण यांच्यातील बेबनाव पुन्हा चर्चेत; चव्हाणांच्या भोकर या बालेकिल्ल्यात चिखलीकरांची टीका

आमदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि चिखलीकर यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगत आहे. चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात भोकरमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या जिल्हा मेळाव्यात चिखलीकरांनी अशोक चव्हाणांचे नाव न घेता भोकर मतदारसंघात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न काही मंडळीकडून होत असून ही दहशत समूळ नष्ट करायची आहे, असा निर्धार व्यक्त केला.

भारतीय जनता पक्षात चिखलीकरांपाठोपाठ अशोक चव्हाणांनी प्रवेश केला. नांदेडची लोकसभेची जागा निवडून आणण्याची जबाबदारी चव्हाणांवर सोपविल्यावरही चिखलीकरांचा झालेला पराभव त्यापाठोपाठ पोटनिवडणुकीतही भाजपाचा झालेला पराभव वरिष्ठांना जिव्हारी लागल्यानंतर चव्हाणांना केंद्रात मिळणारे मंत्रीपद हुकले. त्यानंतर त्यांची कन्या श्रीजया चव्हाण आमदार झाल्या. त्यांच्याही मंत्रीपदासाठी चव्हाणांनी प्रयत्न केले. मात्र वरिष्ठांची नाराजी, सलग दोनवेळा भाजपाचा लोकसभेत झालेला पराभव यामुळे मंत्रीपद मिळू शकले नाही. लोकसभेच्या पराभवानंतर प्रताप पाटील चिखलीकर यांनी काही ठिकाणी आपल्याला पक्षातील मंडळीनीच पाडल्याचा दावा केला होता. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर जिल्ह्यात असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. ज्यात भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्यासह अनेक दिग्गज या पक्षात आले. बंडखोरांसह काही असंतुष्ट मंडळींना भाजपात प्रवेश दिल्याने निष्ठावंतात नाराजी पसरली.

चिखलीकरांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर चिखलीकर आमदार झाले. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी स्वबळाचा नारा देत येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका स्वबळावर लढविण्याचा नारा दिला. त्यांच्या या वक्तव्यास प्रत्युत्तर देत चिखलीकरांनी अशोक चव्हाण काही भाजपाचे नेते नाहीत, असा दावा केला.

नुकताच भोकरमध्ये चिखलीकरांच्या उपस्थितीत नांदेड जिल्हा राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या निमित्ताने मेळाव्याला कोणी येऊ नये यासाठी दहशत निर्माण केल्याच्या बातम्याही येऊ लागल्या. मात्र हा मेळावा यशस्वी झाला. यावेळी बोलताना भोकर मतदारसंघात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न काही मंडळी करत असून, भोकरच्या मेळाव्याला जाऊ नका असा निरोप काही जणांनी दम भरुन दिला. मात्र या दहशतीला झुगारुन हा भव्य मेळावा यशस्वी झाल्याचे सांगून येणार्‍या काळात राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात दहशत चालू देणार नाही, असा इशाराही चिखलीकर यांनी दिला. मी भाजपात गेलो, त्यानंतर तेही भाजपात आले. आता मी राष्ट्रवादीत आलो आणि उद्या अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री झाले तर कदाचित तेही राष्ट्रवादीत येतील असा टोमणाही चिखलीकर यांनी अप्रत्यक्षपणे चव्हाण यांना मारला. काही माणसे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, केवळ जिकडे सत्ता तिकडे आम्ही अशी भूमिका काही मंडळीची आहे, अशी टीकाही त्यांनी केली. एकंदरच पुन्हा एकदा या दोघातील 1995 पासूनचे राजकीय वैमनस्य पुन्हा एकदा वाढू लागले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्याचे पडसाद दिसून येण्याची शक्यता आहे.