दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आप सरकारने महिला सन्मान योजना जाहीर केली आहे. त्यातच आता भाजपचे माजी खासदार प्रवेश वर्मा यांनी खासगी स्वरूपामध्ये महिलांना 1100 रुपये देऊन लाडकी बहीण योजना सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
दिल्लीत भाजप नेते प्रवेश वर्मा यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या 20 विंडसर प्लेस येथे महिलांना 1100 रुपयांचे वाटप करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेन यांनी यासंदर्भातील काही छायाचित्रेही पत्रकार परिषदेत सादर केली. प्रवेश वर्मा यांच्या घरी येणाऱ्या महिलांना 1100 रुपयांचे एक पाकीट कार्ड देण्यात आले. या कार्डवर लाडली योजना असे लिहिण्यात आले असून या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1100 रुपये दिले जाणार आहेत. निवडणुकीनंतर ही रक्कम 2500 रुपये करण्यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे.
भाजपकडून पैसे वाटूनच दिल्ली विधानसभेची निवडणूक जिंकण्याचा डाव आहे. प्रवेश वर्मा यांच्या घरी कोटय़वधी रुपये पडून आहेत. ते पैसे ते खुलेआम वाटत आहेत. ईडी आणि सीबीआयने याकडे लक्ष द्यावे आणि निवडणूक आयोगाने प्रवेश वर्मा यांना अटक करावी, अशी मागणी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेन यांनी केली आहे. दरम्यान आपने यासंदर्भात पोलिसांत तक्रारदेखील दाखल केली आहे.