भाजपचा माजी नगरसेवक पुन्हा खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत

भाजपाचा माजी नगरसेवक मनोज किसन साळुंखे हा खंडणीच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटताच त्याच्यावर दुसरा गुन्हा नोंद होऊन शिवाजीनगर पोलिसांनी त्याच्यासह तिघांना खंडणीप्रकरणी अटक केली.

शहाँनवाज मुजावर, दीपक कोळेकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सागर पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली. सागर पाटील याला मनोज साळुंखे याने जुन्या एसटी स्थानकाजवळील कार्यालयात बोलावून घेतले. त्यांना तारदाळ या गावातील संगमनगरातील दोन गुंठ्यांचा प्लॉट माझा आहे, असे म्हणून वरील तिघांनी मारहाण करत पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच फिर्यादीच्या खिशातून अकरा हजार रुपये काढून जीवे मारण्याची धमकी दिली होती.

साळुंखेवर 19 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 15 गुन्हे शिवाजीनगर पोलिसांत नोंद आहेत. यापूर्वीही साळुंखेवर एका सराफाला पाच लाखांची खंडणी मागितल्याने आणि त्याचे 50 हजार काढून घेतल्याने गुन्हा नोंद होऊन अटक झाली होती. याप्रकरणी जामिनावर सुटका होताच, पुन्हा दुसरा गुन्हा नोंद झाला आहे. तिघांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर उभे केले असता, त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.