खेळपट्टीवर टिकून राहा! गिलख्रिस्टचा फलंदाजांना सल्ला

शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दिवस-रात्र कसोटीत जसप्रीत बुमराच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी गोलंदाजीचा सामना करणे ऑस्ट्रेलियन फलंदाजांसाठी आव्हानात्मक ठरेल. या गोलंदाजीचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी फलंदाजांनी जास्त वेळ खेळपट्टीवर टिकून राहावे, असा मोलाचा सल्ला ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज यष्टिरक्षक-फलंदाज ऍडम गिलख्रिस्टने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना दिला आहे.

‘पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचे प्रमुख फलंदाज अपयशी ठरले होते. गिलख्रिस्टने मार्नस लाबुशेनला संघात कायम राखण्याबाबतही सांगितले. मार्नसवर खेळपट्टीवर टिकून राहण्याची जबाबदारी होती. त्याने 50 हून अधिक चेंडूंचा सामना करत चांगला प्रयत्न केला. जर कसोटीत तुम्ही 50 पेक्षा अधिक चेंडूंचा सामना करत असाल तर तुमची वाटचाल योग्य दिशेने सुरू असते. मार्नसला आठवण करून द्यावी लागेल की, तो दमदार फलंदाज आहे. मला विश्वास आहे की, त्याच्या आजूबाजूचे लोक असेच करत असणार. मार्नसने आपल्या सरावावर विश्वास ठेवावा,’ असे गिलखिस्ट म्हणाला.