
ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगने अखेर आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रशिक्षकपद सोडले. गेल्या सात वर्षांपासून ते या संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचाईजीने सोशल मीडियावर ही माहिती दिली.
दिल्ली कॅपिटल्सला आयपीएलच्या इतिहासात कधीच विजेतेपद पटकाविता आले नाही. रिकी पॉण्टिंग यांनी 2019मध्ये दिल्ली संघाचे मुख्य प्रशिक्षकपद स्विकारले होते. 2021मध्ये या संघाने उपविजेतेपद पटकाविले होते. 2019 व 2020 मध्ये हा संघ प्ले ऑफपर्यंत पोहोचला होता. 2021 नंतर दिल्ली कॅपिटल्सला कधीच प्ले ऑफपर्यंतही जाता आले नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये हा संघ सहाव्या स्थानावर राहिला होता. आता आगामी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सौरभ गांगुली यांच्या खांद्यावर सोपविली जाऊ शकते. संघाचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण आमरे आपल्या पदावर कायम राहण्याची शक्यता आहे. रिकी पॉण्टिंग यांनी सात वर्षांच्या कार्यकालात दिल्ली कॅपिटल्ससाठी बहुमोल योगदान दिले, अशा शब्दांत फ्रेचाईजीने कृतज्ञता व्यक्त केली.