धोनीपेक्षा ऋषभ पंतच सरस, पॉण्टिंगकडून कौतुक

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचे मुख्य प्रशिक्षक राहिलेल्या रिकी पॉण्टिंग याने महेंद्रसिंह धोनीपेक्षा ऋषभ पंत हाच सरस यष्टिरक्षक फलंदाज असल्याची स्तुतिसुमने उधळली आहेत.

पॉण्टिंग म्हणाला, ‘डिसेंबर 2022 मध्ये जीवघेण्या कार अपघातातून बचावलेल्या ऋषभ पंत केवळ दीड वर्षात क्रिकेटच्या मैदानावर परतला, हे खरेच अचंबित करणारे होय. तो एक प्रतिभावान क्रिकेटपटू आहे. पंतने 33 कसोटींत पाच शतके ठोकली असून धोनीला सहा शतकांसाठी 90 कसोटी सामने खेळावे लागले. यावरून ऋषभ पंतची क्रिकेट खेळण्याची पद्धत लक्षात येते. क्रिकेटच्या मैदानावर तो नेहमीच छाप सोडण्यासाठी आतुर असतो,’ असेही पॉण्टिंगने म्हटले आहे.

वाटलं नव्हतं, पंत पुनरागमन करेल!

‘ऋषभ पंतचा भयानक कार अपघात झाला होता. अनेक ठिकाणी गंभीर दुखापत झाल्याने तो क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकेल, असं वाटत नव्हतं. डॉक्टरांनीदेखील त्याला प्रदीर्घ काळ क्रिकेटपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता, मात्र 2024 च्या आयपीएलमध्ये पंतने झोकात केलेलं पुनरागमन नक्कीच काबिले तारीफ आहे. इतक्या गंभीर दुखापतीवर अल्पावधीत मात करून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुन्हा स्वतःला सिद्ध करणाऱ्या पंतला खरंच मनापासून हॅण्ड्स अप!’ अशा शब्दांत रिकी पॉण्टिंगने ऋषभ पंतचे कौतुक केले.

ऋषभ पंतने 2024 च्या ‘आयपीएल’मध्ये 446 धावांची लयलूट केली. त्यानंतर त्याने टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये आठ सामन्यांत 171 धावा फटकाविल्या. आता त्याचे कसोटी क्रिकेटमध्येही पुनरागमन झाले आहे. बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी त्याची ‘टीम इंडिया’त निवड झाली आहे.