वनरक्षक प्रवीण मोरेंचा अपघात की घातपात , चौकशीसाठी गेले अन् डंपर चालकाने चिरडले

आदिवासींच्या जमिनीबरोबर दफनभूमी हडप केल्याप्रकरणी चौकशी करून घरी परतणाऱ्या वनरक्षकाला डंपर चालकाने चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत वनरक्षक प्रवीण मोरेंचा जागीच मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, डंपर चालक फरार झाला असून वनरक्षक मोरेंचा अपघात की घातपात? असा प्रश्न उपस्थित झाला आहे, तर या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

साळोख ग्रामपंचायत हद्दीतील नारळाचीवाडी येथे बुधाजी थोराड आणि कमळी कांबडी यांची 8 एकर जमीन आहे. तसेच या जागेला लागून मृत तुलसीबाई पवार यांची सीलिंगची जागा आहे. शासनाने ही जागा आदिवासी शेतकऱ्यांना शेतीसाठी दिली होती. त्यांच्या जागेत दफनभूमी आहे. मात्र याच वाडीत राहणारे ताहिर सैरे आणि तौसिफ मुल्ला या दोघांनी जेसीबीच्या सहाय्याने जमीन साफ केली. यात अनेक सागाची झाडे तोडण्यात आली आहेत, तर दफनभूमीतील मृतदेह उकरले असल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी तहसीलदार मंडळ अधिकारी सरपंच आणि वन विभागाला तक्रार दाखल केली होती.

कर्जत तालुक्यात प्रथमच अशा प्रकारे एका अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून अपघात कसा झाला यावर चौकशी सुरू आहे.
समीर खेडेकर (वन विभाग पश्चिम विभागीय अधिकारी)

गुन्हा दाखल करण्याचे ग्रामस्थांना दिले होते आश्वासन

चौकशीसाठी वनरक्षक प्रवीण मोरे यांनी 30 जानेवारी रोजी घटनास्थळाची भेट घेतली. जागेची पाहणी करून झाडांची कत्तल केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे मोरे यांनी ग्रामस्थांना आश्वासित केले होते. त्यानंतर नेहमीप्रमाणे आपले काम आटपून बदलापूर येथील घरी जाण्यासाठी मोटरसायकवरून निघालेल्या वनरक्षक मोरे यांना बोराटपाडा रस्त्यावरील लव्हाळी गावच्या निर्जनस्थळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव डंपर चालकाने जोरदार धडक दिली. या धडकेत मोरे यांचा जागीच मृत्यू झाला.