
चंद्रपूर जिल्ह्यातील मूललगत वाघाचे तीन छावे पकडण्यात वन विभागाला यश मिळाले. या बछड्यांची आई चार दिवसांपूर्वीच जेरबंद करण्यात आली होती. त्यामुळे बेवारस झालेल्या बछड्यांना पकडून त्यांना संरक्षण देणे गरजेचे झाले होते. हे बछडे साधारणतः एक वर्षे वयाचे आहेत. मूलजवळ चितेगाव परिसरातील जंगलात मागील चार दिवसांपासून शोधले जात आहे. यासाठी वन विभागाने वेगवेगळे पथक तयार केले. दिवसरात्र शोध घेतल्यानंतर मध्यरात्री हे बछडे चितेगावजवळ उमा नदीच्या किनाऱ्यावर सापडले. त्यांना रात्रीच चंद्रपूर येथे वन्यजीव उपचार केंद्रात हलवण्यात आले असून, त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या बछड्यांच्या आईला पकडल्यानंतर त्यांची उपासमार होऊ नये, यासाठी त्यांना शोधणे गरजेचे झाले होते. या बछड्यांच्या आईने याच परिसरात तिघांचा बळी घेतल्याने तिला चार दिवसांपूर्वीच पकडण्यात आले होते.