शिरुर तालुक्यातील शास्तबाद येथील शेतात असलेल्या शेळ्या-मेंढ्यांवर बिबट्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात 15 ते 16 शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याचा पंचनामा करा, अशी मागणी संबंधित शेतकऱ्याने केली. मात्र, समोर केवळ 7 शेळ्या-मेंढ्याच आढळत आहेत. उर्वरित शेळ्या बिबट्याने फस्त केल्याचा पुरावा नाही. त्यामुळे आम्ही केवळ सात शेळ्या-मेंढ्याचाच पंचनामा करणार, अशी धक्कादायक उत्तरे शेतकऱ्याला देण्यात आली.
शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडील शास्ताबाद येथील शेतात असणाऱ्या शेळ्या, मेंढ्यांच्या तळावर सोमवारी पहाटेच्या सुमारास बिबट्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात लहान मोठ्या 7 शेळ्या-मेंढ्या ठार, तर रावडेवाडी येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक मोठी पाळीव घोडी ठार झाली.
शास्ताबाद येथे शेतकरी चंद्रकांत गोरडे यांचा शेळ्या-मेंढ्यांचा वाडा आहे. शेतीला जोडधंदा म्हणून ते पशुपालन व्यवसाय करतात. शेतात त्यांनी शेळ्या-मेंढ्यांसाठी मोठी जाळी तयार केली आहे. त्यांनी रविवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे जाल्टी बिबट्यांनी जाळीवरून आत प्रवेश करून शेळ्या-मेंढ्यांवर हल्ला चढवला. बिबट्याने लहान-मोठ्या 7 शेळ्या-मेंढ्यांचा फडशा पाडला. चंद्रकांत गोरडे शेतात गेले असता हा प्रकार उघडकीस आला. या घटनेत इतर अनेक शेळ्यांना गंभीर इजा झाली असल्याने नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनरक्षक गणेश पवार, वन कर्मचारी हनुमंत कारकूड यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात बिबट्याची मोठ्या प्रमाणात दहशत पसरली आहे. वन विभागाने संबंधित शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळवून द्यावी. तसेच सदर बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
पुरावा आढळला नसल्याने वन विभागाकडून 7 शेळ्या-मेंढ्यांचाच पंचनामा
शेतकरी चंद्रकांत गोरडे यांनी सांगितल्याप्रमाणे बिबट्याने जवळपास लहान-मोठ्या 15 शेळ्या-मेंढ्यांचा फडशा पाडला. त्यामुळे वनविभागाने 15 शेळ्या-मेंढ्यांची नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी केली. परंतु, लहान शेळ्या बिबट्याने फस्त केल्याने पुरावा आढळून आला नसल्याने, वन विभागाकडून केवळ 7 शेळ्या-मेंढ्यांचा पंचनामा केला असल्याचे वन कर्मचारी हनुमंत कारकूड यांनी सांगितले, तर येथे दोन बिबट्यांनी हल्ला केला असण्याची शक्यता कारकूड यांनी व्यक्त केली आहे.