उत्तर प्रदेशातील लांडग्यांच्या हल्ल्यामुळे वन्य प्राण्यांचे मानवी वस्तीवर होणारे हल्ले सध्या चर्चेत आले आहेत. वन्य प्राणी व मानवाच्या वाढत्या संघर्षामुळे महाराष्ट्रातही गेल्या काही वर्षांपासून वन्य प्राण्यांचे मानवी वस्तीवरील हल्ले वाढले आहेत. मागील तीन वर्षांत राज्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 261 जणांचा मृत्यू झाला, तर तब्बल दोन हजारांहून अधिक गावकरी जखमी झाल्याची वन विभागाची आकडेवारी आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात गावकऱयांचा मृत्यू, पशुधनाच्या नुकसानभरपाईपोटी राज्य सरकारच्या तिजोरीवर 145 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडला आहे.
उत्तर प्रदेशातील बेहराईच जिह्यात लांडग्यांनी गेल्या काही दिवसांत दहशत निर्माण केली आहे. लांडग्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत किमान आठजणांचा मृत्यू झाला आहे, तर 25 पेक्षा अधिक गावकरी जखमी झाले आहेत. बेहराईचमधील या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वन्य प्राण्यांचे गावकऱयांवरील हल्ल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अमरावतीमधील मेळघाटातल्या धारणी तालुक्यात काही वर्षांपूर्वी लांडग्यांनी दहशत निर्माण केली होती. पुणे जिह्यात लांडग्यांची संख्या अधिक आहे. त्यातही सासवड भागात लांडगे जास्त संख्येने आढळून येत असल्याचे सांगण्यात येते.
गेल्या काही वर्षांत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात गावकरी मृत्युमुखी पडण्याचे किंवा जखमी होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पुटुंबाला आधार देण्यासाठी आर्थिक नुकसानभरपाईच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. वाघ, बिबटय़ा, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती व रानपुत्र्यांच्या हल्ल्यात एखादा व्यक्ती मृत्युमुखी पडल्यास वारसांना 25 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. व्यक्तीला कायमचे अपंगत्व आल्यास साडेसात लाख रुपये, गंभीर जखमीला पाच लाख रुपये आणि किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचाराचा खर्च दिला जातो. खासगी रुग्णालयात उपचार करणे आवश्यक असल्यास पन्नास हजार रुपयांपर्यंतची मदत सरकारच्या वतीने देण्यात येते.
मागील तीन वर्षांत वन्य प्राण्यांचे माणसांवरील हल्ले
वर्ष मृत्यू जखमी
2021-22 86 553
2022-23 111 762
2023-24 63 799
मागील तीन वर्षांत शेतकऱयांच्या पशुधनावरील हल्ले
वर्ष मृत्यू जखमी
2021-22 10 हजार317 343
2022-23 12हजार517 640
2023-24 4हजार648 11हजार819
मागील तीन वर्षांतील आर्थिक नुकसानभरपाई
वर्ष नुकसानभरपाई
2021-22 80 कोटी रु.
2022-23 127 कोटी रु.
2023-24 145 कोटी रु.