
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारा, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या महिनाभराने कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून मुसक्या आवळल्या. त्याला मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आज राजारामपुरी पोलीस ठाण्यात कोल्हापूर पोलिसांच्या फॉरेन्सिंग विभागाच्या पथकांकडून कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले.
फोनवरून धमकी दिल्यानंतर राज्यभरात संतापाची उसळलेली लाट आणि प्रकरण अंगलट येताच तो फोन मी केलाच नाही, ‘तो मी नव्हेच’चा सूर आळवणाऱ्या कोरटकरने फोनमधील सर्व डाटा पूर्णपणे नष्ट करून तो पोलिसांकडे दिला. आता त्याच्या आवाजाच्या नमुन्यातून उलगडा होणार आहे. या संदर्भातील सर्व अहवाल पोलीस न्यायालयाकडे सादर करणार आहेत.
कोरटकरला सुरक्षेच्या कारणास्तव राजारामपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. तसेच आज सकाळपासून पोलिसांनी चौकशी आणि पुढील कारवाईला सुरुवात केली. राजारामपुरी पोलीस ठाण्याबाहेर राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली असून, पोलीस स्टेशन परिसरात अत्यंत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजारामपुरी पोलीस ठाण्यात कोल्हापूर पोलिसांच्या फॉरेन्सिंग विभागाच्या पथकांकडून प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले.
पोलीस कोठडीबाहेरील सीसीटीव्ही फुटेजची मागणी
प्रशांत कोरटकरला ज्या पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवले आहे, त्या कोठडीबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे तीनही दिवसांचे संपूर्ण फुटेज मिळावेत, तसेच पोलीस स्टेशनमध्ये कार्यालय व आवारात सीसीटीव्ही कोणत्या भागात बसवलेले आहेत, ते सुरू आहेत का याबाबतचा तपशील न्यायालयीन कामकाज व माहितीसाठी पाहिजे असल्याची दोन पत्रे तक्रारदार इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी दिली आहेत. यावर इंद्रजित सावंत यांचे वकील अॅड. असीम सरोदे, अॅड. हेमा काटकर, अॅड. योगेश सावंत, हर्षत सुर्वे, अॅड. पल्लवी थोरात यांच्या सह्या आहेत. यापूर्वीही कोरटकर याचा पासपोर्ट त्याच्या पत्नीकडून पोलीस ठाण्यात जमा करून घेण्याचे पत्र दिल्यानंतर कोरटकरच्या पत्नीकडून पासपोर्ट जमा करण्यात आला होता.