![trump](https://www.saamana.com/wp-content/uploads/2023/08/trump-696x447.jpg)
अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमेरिकेत पुन्हा सत्तेत आल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझाबाबतची त्यांची योजना सादर केली. यामध्ये गाझा पट्टीला जोडण्याचा आणि पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, इराणने या योजनेला विरोध दर्शवला होता. या प्रकरणावर आता इराणी संसदेतील परराष्ट्र धोरण आयोगाचे सदस्य मुस्तफा जरेई यांनी मोठे विधान केले आहे.
इराणी संसदेतील परराष्ट्र धोरण आयोगाचे सदस्य मुस्तफा झारेई यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ईटा वर ट्रम्प यांच्याविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा मी डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्यास क्षणभरही मागेपुढे पाहणार नाही. मी एक राजकीय अधिकारी आहे आणि राजकीय पद्धतीने मी हे सांगत आहे’, असे त्यांनी म्हटले. त्यांचे हे विधान सध्या चर्चेचा विषय बनले आहे.
इराणबाबत ट्रम्प यांनी घेतली कठोर भूमिका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये एका कार्यकारी आदेशावरही स्वाक्षरी केली. यावेळी त्यांनी सांगितले की, मला इराणसोबत एक मोठा करार करायचा आहे, जेणेकरून ते त्यांच्या आयुष्यात पुढे जाऊ शकतील. मात्र इराणला अण्वस्त्रे वापरण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट धमकी दिली. ट्रम्प म्हणाले, तेहरानने मला मारण्याचा प्रयत्न केला तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. इराणने मला मारण्याचा प्रयत्न केला तर इराण पृथ्वीवरून नष्ट होईल. इराण पूर्णपणे नष्ट होईल, याबाबतचे आदेश आपण अधिकाऱ्यांना दिले आहेत, असे ते म्हणाले होते.
माझ्या जीवाचं बरंवाईट झाल्यास, इराण नेस्तनाबूत होईल; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी