सोने 1.30 लाखापर्यंत जाण्याची शक्यता, अमेरिकेत मंदीची भीती; गोल्डमन सॅक्सचा अंदाज

अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धामुळे जगावर मंदीचे सावट घोंघावत आहे. मंदीच्या भीतीमुळे यंदा सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1.30 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज परदेशी गुंतवणूक बँक गोल्डमन सॅक्सने वर्तवला आहे. मात्र हे केवळ मंदी आल्यासच घडेल असे त्यांनी नमूद केले. एकूणच व्यापार युद्धाचा भडका उडाल्यास एक तोळे सोने खरेदी करण्यासाठी 1.30 लाखांपर्यंत रक्कम मोजावी लागू शकते. दरम्यान, 2025 च्या अखेरीस सोन्याचा भाव प्रति तोळा 1.10 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो असे भाकीत गोल्डमन सॅक्सने वर्तवले. मंदीची शक्यता असताना यापासून बचाव करण्यासाठी सोन्याची मागणी वाढली आहे. आताच्या घडीला सोने विक्रमी उच्चांकावर आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 10 ग्रॅम 24 पॅरेट सोन्याचे दर 93,353 वर पोहोचले आहेत. यंदा सोन्याच्या किमतीत 22.57 टक्क्यांनी म्हणजेच 17,191 रुपयांनी वाढ झाली आहे.

सोने सुरक्षित गुंतवणूक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे व्यापार युद्धाचा धोका वाढला आहे. यामुळे अर्थव्यवस्थेचा विकास दर मंदावू शकतो. जागतिक मंदीची भीती आहे. मंदीच्या काळात सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. यंदा रुपयाचे मूल्य जवळपास चार टक्क्यांनी घसरले आहे. लग्नसराईचा हंगाम असल्याने सोन्याची मागणी वाढत आहे.