
बांगलादेशची फाळणी 1971 मध्ये झाली होती तेव्हापासून प्रथमच पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये अधिकृतपणे व्यापार सुरू झाला आहे. 1971 नंतर प्रथमच बांगलादेशात पाकिस्तानचे सरकारी जहाज जात आहे. पाकिस्तानने ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तानच्या माध्यमातून 50 हजार टन तांदूळ बांगलादेशला निर्यात करण्याचा करार केला असून दोन टप्प्यांत तांदळाची खेप पाठवली जात आहे.
25 हजार टनांची पहिली खेप बांगलादेशात रवाना झाली, तर दुसरी खेप मार्च महिन्याच्या सुरुवातीला पाठवली जाईल. प्रथमच सरकारी मान्यतेने पाकिस्तान नॅशनल शिपिंग कॉर्पोरेशनचे एक जहाज बांगलादेशच्या बंदरावर पोहोचेल. गतवर्षी पाकिस्तानातील खासगी कंपनीचे जहाज बांगलादेशात गेले होते. मात्र हे सरकारी करारानुसार नव्हते.