‘एआय’ तपासणार आता आयटीआर

आयटीआर फाईल करण्यासाठी आता अवघा एक दिवस उरला आहे. विनादंड आयटीआर भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2024 आहे. अशातच आयकर विभागाला यंदा रिफंड देण्यास वेळ लागू शकतो, असे म्हटले जातंय. कारण आयकर विभाग ‘एआय’च्या मदतीने रिटर्न तपासत असल्याचे समजतंय. करदाते वेगाने आयटीआर फाईल करत असून हा आकडा साडेपाच कोटींच्या आसपास पोचला आहे. आयटी पोर्टलवर करदात्यांना आयटीआर फाईल करताना अडचणी येत असल्या तरी दररोज लाखो आयटीआर फाईल होत आहेत.

रिफंडला विलंब होण्याची शक्यता
करदात्यांना आयटी विभागाकडून परताव्याची प्रतीक्षा आहे. साधारणपणे रिटर्नची प्रक्रिया झाल्यानंतर रिटर्न मिळण्यास 5 ते 10 दिवस लागतात. चार्टर्ड अकांउटंट आनंद लुहार यांनी दावा केलाय की करदात्यांना यावर्षी रिटर्नसाठी प्रतीक्षा करावी लागेल. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात आयटीआर प्रोसेस होईल, असे सांगण्यात येतंय.

उरला फक्त 1 दिवस
इन्कम टॅक्स रिटर्न फाइलिंगची डेडलाईन संपायला केवळ एक दिवस उरला आहे. करदात्यांनी जर 31 जुलैपर्यंत आयटीआर फाईल केली नाही तर करदात्याला दंड म्हणून मोठी रक्कम चुकवावी लागेल. 31 जुलैपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे निःशुल्क आहे.

टॅक्सपेयर्सचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असल्यास त्याला 5 हजार रुपये दंड द्यावा लागणार आहे.

पहिल्यांदा एआय-आयटीआर प्रोग्रॅमचा वापर
आयकर विभाग पहिल्यांदाच आयटी रिटर्न करण्यासाठी एआय तंत्राचा वापर करत आहे. एआयवर आधारित सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून त्याद्वारे करदात्याच्या पॅनकार्ड व आधार कार्डशी संबंधित माहिती मिळेल. ही माहितीनंतर रिटर्नमध्ये दिलेल्या माहितीशी पडताळून बघितली जाईल.

एआय-आयटीआर प्रोग्रॅमच्या मदतीने करदात्याची आधार व पॅनकार्डशी जोडलेली माहिती मिळेलच. पण त्यासोबत घोषित- अघोषित बँक खाती, एफडी-आरडी, अन्य बचत योजनांमधील गुंतवणूक, मालमत्तेची खरेदी विक्री, वाहनांची खरेदी, परदेश यात्रा, व्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शन आदींची तपासणी होईल.