ईडीपासून सुटका मिळावी म्हणून भाजपसोबत गेलो, छगन भुजबळ यांचा गौप्यस्फोट

ajit-pawar-chhagan-bhujbal

भाजपसोबत गेलो म्हणून आमच्या सहकाऱ्यांना खूप आनंद झाला असे विधान छगन भुजबळ यांनी केले आहे. तसेच ईडीपासून सुटका मिळावी म्हणूनच भाजपसोबत केले असेही भुजबळ म्हणाले. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत भुजबळांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे.

पत्रकार आणि लेखक राजदीप सरदेसाई यांचं नुकतंच एक पुस्तक 2024 The Election That Surprised India प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात सरदेईसाई यांनी ईडीवर एक प्रकरण लिहीले आहे.

यात भुजबळ म्हणाले की आम्ही भाजपसोबत युती केल्यामुळे अनेक नेत्यांना आनंद झाला. कारण अनेकांची ईडीपासून सुटका झाली होती. ईडीपासून सुटका झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वाःस टाकला. माझी ईडीपासून सुटका झाली मला वाटलं माझा पुर्नजन्मच झाला.

मी ओबीसी असल्याने ईडीसारख्या यंत्रणा माझ्या मागे लागल्या होत्या. तर मी उच्च जातीचा असतो तर मला असे वागवलं नसतं असेही भुजबळ म्हणाले. मी दोन ते अडीच वर्ष तुरुंगात काढली. मला जामीन मिळाल्यानंतरही मला पुन्हा ईडीची नोटिस आली. मी वयाची 75 वर्ष पूर्ण केली आता आणखी किती चौकशांना सामोरं जायचं असा माझ्यापुढे प्रश्न होता. आधीच 100 कोटी रुपयांच्या आरोपांवरून अनिल देशमुखांना ईडीने अटक केली होती. भाजपमध्ये आलात तरच सुटका होईल असा निरोप देशमुखांना आला होता असे भुबळ म्हणाले. देशमुखांनंतर मलाही परत अडकवतील अशी भुजबळांना भिती होती. तुरुंगातले दिवस आठवले तर माझी झोप उडते, या वयातली ईडी माझा पिच्छा सोडायला तयार नव्हती असेही भुजबळांनी म्हटले.

फक्त अजित पवारच नाही तर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचीही ईडीची चौकशी सुरू होती. मला, नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना ईडीने अटकही केली होती. त्यामुळे अशा वेळी भाजपसोबत हातमिळवणी करावी, त्याशिवाय सुटका नाही अशी भावना सर्व नेत्यांची झाली होती. आम्ही शरद पवार यांच्याकडे हा विषय काढला. पवार साहेबांना सगळं काही समजत होतं पण तरी भाजपसोबत जाण्यास त्यांचा विरोध होता. त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षातील आमदारांनी भाजपसोबत हातमिळवणी करण्याचे ठरवले. पक्षातील बहुतांश नेत्यांनही हा निर्णय मान्य केला. भाजपसोबत युती केल्यानंतर सर्व नेत्यांची ईडीपासून सुटका झाली असेही भुजबळ म्हणाले.