ऑनलाईन फूड ऑर्डर केल्यानंतर चुकीच्या ऑर्डर्सच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. अशीच एक घटना उज्जैनमध्ये समोर आली आहे. झोमॅटोवरून भाजी ऑर्डर केल्यानंतर पार्सलमध्ये नॉनव्हेज आले. यानंतर ग्राहकाने थेट अन्न विभागाकडे तक्रार केली. ग्राहकाच्या तक्रारीनंतर अन्न विभागाने हॉटेलचा परवाना रद्द केला.
राजगढमधील रहिवासी असलेले औषध कंपनीचे एमआर मनोज चंद्रवंशी हे कामानिमित्त उज्जैनला गेले होते. तेथे ते खाती समाजाच्या मंदिरात थांबले होते. मंगळवारी त्यांनी झोमॅटोवरून शेव टोमॅटोची भाजी ऑर्डर केली.
पार्सल आल्यानंतर मनोज जेवायला बसले असता भाजीत हाडांचे तुकडे मिळाले. तात्काळ त्यांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. पोलिसांनी अन्न विभागाला माहिती दिली. यानंतर अन्न विभागाच्या पथकाने तात्काळ सदर हॉटेलमध्ये दाखल होत तपासणी केली. यावेळी हॉटेलमध्ये गैरप्रकार दिसून आला. हॉटेलमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी जेवण एकाच ठिकाणी बनवलं जात होतं. तसेच जेवण बनवण्यासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करण्यात येत होता.
चुकीच्या पार्सलप्रकरणी हॉटेल चालकाकडे चौकशी केली असता चुकून शाकाहारी जेवणात मांसाहार मिसळलं गेलं असावं असे त्याने सांगितले. अन्न विभागाने हॉटेलवर कारवाई करत हॉटेलचा परवानाच रद्द केला.